Wednesday, June 15, 2011

कोणाला कुठे पाहावे ?

कोणाला कुठे पाहावे ?
काय आहे पण एक गम्मत आहे . परवा मी अशीच चालले होते रस्त्याने .मग एका दुकानात गेले .आणि तिथे अचानक मला एक बाई दिसल्या .मला ओळखलेत का ? असे विचारू लागल्या .आता हा असा प्रश्न विचारणाऱ्या लोकांची तर मला बाई धास्तीच असते .कारण एक तर बऱ्याच  वेळा मला ही व्यक्ती कोण हे अजिबात आठवत नाही किंवा नुसता चेहरा आठवतो पण नाव किंवा यांना कुठे पाहीले आहे हे अजिबात आठवत नाही. मग त्या मात्र अशा जोशात बोलू लागल्या की मी त्यांना ओळखले नाही किंवा मला त्यांचे नाव आठवत नाही हा मोठा गुन्हा झालाय ......शेवटी मी त्यांच्यासमोर शरणागती पत्करली आणि म्हणले ,नाही हो काकू मला पहिल्या सारखा वाटतंय पण बाकी आठवत नाही . मग म्हणाल्या ,अहो तुम्ही नाही का मागे लायब्ररी मध्ये यायचात सिंहगड रोडला . तिकडे पाहील होत बऱ्याच  वेळा तुम्हाला .असे त्यांनी सांगितल्यावर  मी सुटकेचा नि:श्वास  टाकला. कदाचित त्यांना लायब्ररीत पाहीले असते तर सहज ओळखले असते .पण देवळात.....आठवले नाही .
     खर म्हणे माणसाला एखाद्या व्यक्तीस एका विशिष्ट ठिकाणी पहायची सवय झाली ना की दुसरीकडे त्या व्यक्तीला पाहूनही लक्षात येत नाही की हा माणूस कोण ? मध्ये एकदा बसने जाताना समोरच्या बाकावरील माणूस मला ओळखीचा वाटू लागला . काही केल्या आठवेना .बर तो माणूस पण काही ओळख  दाखवेना . मग मी कशी विचारणार ? आता एखादी गोष्ट माझ्या डोक्यात घुसली की मी तिचं छडा लागेपर्यंत वेडी पिशी होते . मग दिवसभर मला सारखे तेच आठवत होते .शेवटी एकदम अचानक लक्षात आले की हा माणूस म्हणजे  आमच्या घराजवळच्या किराणा दुकानात असणारा विक्रेता .    
     आता अजून एक प्रश्न म्हणजे माझ्याकडे येणारे जातक .स्वतःच्या समस्या आणि त्यांचे समाधान यावर माझ्याशी तास तास बोलणारे , पण बऱ्याच कुंडल्या  आणि बरेच वर्ष या व्यवसायात असल्याने मी मात्र काही जणांना विसरून जाते .पण त्या लोकांना मात्र त्यांना संकटातून  सुटण्याचा मार्ग दाखवल्याने किंवा त्यांचे दडपण काही प्रमाणात का होईना माझ्याडून कमी झाल्याने त्यांच्या मात्र मी एकदम लक्षात असते .मग कधी अचानक लक्ष्मी रोडवर madam ओळखलत का? मी नाही का आलो होतो बघा ,माझ्या बहिणीच्या लग्न संदर्भात ,किंवा तुम्ही नाही का मला माझ त्या मुलीबरोबर लग्न होईल की नाही हे सांगितलं... किंवा अहो madam  ,अजूनही पाहता का तुम्ही भविष्य ....असे अचानक एक बॉम्ब टाकणारे पण भेटतात ....
      तुम्हाला कुणाला असा अनुभव आलाय का की जी व्यक्ती ज्या ठिकाणी आहे तिथेच ओळखू येते ....मग सांगा की मला  
सोनाली लिखितकर  

Friday, May 20, 2011

तीर्थ क्षेत्र देहू

तीर्थ क्षेत्र देहू
काल बऱ्याच दिवसांनी देहू गावाला गेलो होतो. संध्याकाळ अतिशय शांत ,समोर संथ वाहणारी इंद्रायणी नदी .रात्री घरी परतणाऱ्या पक्षांची लगबग ,तुकारामांनी ३५० वर्षांपूर्वी जागवलेला विठ्ठलाच्या अगाध  भक्तीचा मळा ,आणि त्या खोल डोहामध्ये बुडालेल्या आणि तुकारामंची १३ दिवस कठोर परीक्षा घेऊन पुन्हा जशाच्या तशा मिळालेल्या अमृत मयी अभंग गाथा .सर्वानीच मनावर एक गूढ गंभीर फुंकर घातली होती .संध्याकाळी मंदिरात वाजणारे नगारे , खोल इंद्रायणी नदी  आणि असंख्य विठ्ठलाच्या आणि तुकोबांच्या आठवणी मनात घेऊन ,त्या आठवणींचे  तरंग स्वतःवर उमटत  ;त्या नदी समोर बसलेली मी . असा वाटत होत की पुन्हा त्या संसारात जाऊच नये .इथेच विठ्ठल नामाचा गजर करत त्या परब्रम्हाशी  एकरूप व्हावे .

मानस पूजा

मानस पूजा
आपल्या अध्यात्मिक ग्रंथांमध्ये मानस पुजेस  फार मोठे स्थान दिले आहे .बऱ्याच वेळा काही लोकं पूजा करत असतात पण मन मात्र दुसरीकडे असते .सासूबाई पूजा करता करता आपल्या सुनेस सूचना करत असतात तर सून पूजा करताना मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देत असते .पण केवळ हळदी कुंकू फुले आणि उदबती या पेक्षा काहीही नसताना केलेली मानसपूजा फार महत्वाची ठरते .पण ती कशी करायची याची माहिती व्हावी म्हणुन हा प्रपंच .अर्थात प्रत्येकाची पूजा करण्याची वेगळी पद्धत असू शकते
परवा असंच दुपारी बसले होते .आणि अचानक डोळ्यापुढे मागच्या वर्षी गेलेल्या गंगटोक च्या  जंगलातील आठवणी आल्या .अतिशय सुंदर हिरवेगार पसरलेले जंगल आणि त्यातून झुळ झुळ आवाज करत वाहणारा ओढा, त्या ओढ्याच्या काठा काठाने मी जातीय .शेजारीच मंद सुगंध येणारे एक पांढऱ्या शुभ्र फुलांचे झाड आहे. कसले झाड आहे कुणास ठाऊक ? त्याच्या जवळ गेले आणि ते झाड थोडेसे हलवले तर अगदी माझ्या अंगावर त्याच्या कोमल पाकळ्यांचा  वर्षाव झाला .माझी पावले बुडतील इतक्या पाकळ्यांचा खच पडला .मी अलगद त्यातून एक ओंजळ भरून घेतली आणि त्यांचा सुगंध घ्यावा अशी इच्छा झाली पण त्याच बरोबर माझ्या परम प्रिय प्राण सख्याची मला  आठवण आली. कुठे आहे माझा जिवलग ,? माझा सख्या हरी , माझा कृष्ण ...? बरेच दिवसात दिसला नाही . अगदी त्याच क्षणी एक पांढऱ्या वस्त्रातला एक छोटा मुलगा मला दिसला .अरे बाळा ,माझा कृष्ण कुठे पाहिलास का रे?
अग,  त्या छोट्याशा वाटेने पुढे गेलीस ना की लगेचच त्या झाडांच्या जवळ आहे तो.
बर बाळा, पहाते हा ...असे म्हणुन मी पुढे निघाले .छोट्याशा वाटेने पुढे गेले झाडांच्या मागे पाहीले पण तो दिसला नाही .पुढे पाहीले मागे पाहीले ,गोल फिरून पाहीले . मग अजून जरा पुढे जाऊन पाहीले .कुठेच दिसेना माझा राजा !!मी त्याच्या करता तडफडू लागले .कुठे आहेस रे ?किती वाट पहायची तुझी .?तरीही तो दिसला नाही .मग मात्र डोळ्यात पाणी भरून आले हातातील फुलांच्या ओंजळीवर डोळ्यातील थेंब पडले .त्याच क्षणी त्याच्या बासरीचा; मनाचा ठाव घेणारा आर्त ,पण सुमधुर ध्वनी कानावर पडला .आणि तिथेच एका लाकडाच्या ओंडक्यावर तो दिसला, किती सुंदर !!!!!!!किती प्रेमळ !!!!!!!किती आणि कसा ....शब्दच संपले माझे .त्याच्या कृपाळू नेत्रांकडे पाहीले मी .
"कुठे होतास रे राजा इतके दिवस आणि केव्हाची शोधतीय  मी तुला ?
"अग तुच किती दिवस झाले मला विसरलीस, चक्क २ दिवस झाले गं .....मी तरी केव्हाची वाट पहात बसलोय तुझी इथे . काल तर झोपलो सुद्धा नाही .
पण मगाशी तर इथे दिसला नाहीस ?
अग तुला माहितीय ना तुला, अतिशय आर्त पणे माझी आठवण येईल तेव्हाच मी भेटेन  म्हणुन ....
हो ना कृष्णा, मी उत्तरले .,ही बघ फुले ,किती गोड आहेत ना .
तू माझ्या करता आणलीस ना मग ती खूपच गोड आणि सुंदर असणारच .
कृष्णा ,जरा थांब इथे बस बर ....तुझे पाय पाहू . अरे , ...हे काय रे पितांबराला इतकी धूळ कशी ?
अग काय सांगू ,आज २, ४ भक्त मोठ्या संकटात सापडले होते मग खूप धावाधाव   केली .
अरे राम !मग आता कसे आहेत भक्त गण .?
आता ठीक आहेत गं.
थांब जरा आधी मी जरा तुझ्या चरण कमलांचे दर्शन घेते रे .मग अतिशय हळुवार पणे ,त्याची पावले पाहीली धावून  धावून आणि उन्हातान्हात अगदी लाल झाली होती .मी म्हणाले थांब इथेच .आणि  पटदिशी धावले नदीपाशी . माझ्या ओंजळीत गार पाणी घ्यावे म्हणुन विचार केला तर काय ओंजळीत मगाचीच  फुले राहिली होती .मग ती फुले तिथेच ठेवून दिली आणि हातात थंड पाण्याची ओंजळ घेऊन पळतच त्याच्या कडे गेले .त्या थंड पाण्याने हळुवार चोळून त्याचे सुकोमल चरण धुतले .माझा कमल नयन ,माझ्या कडे आनंदाने पहात होता .अरे थांब ना फुले तिकडेच राहिली .
अग थांब ग ,पहा ....इथे.... त्याने पायाकडे बोट केले . मी नजर टाकली तर काय मी आणलेलीच फुले त्याच्या पायावर .अग तू मनात जेव्हा भावना आणलीस तेव्हाच ती मला पोचली .माझे नेत्र पुन्हा भरून आले .अग राणी किती रडशील सारखी ? तुझे असं  हे अपार प्रेमच मला तुझ्याकडे सारखं खेचून आणत बघ .त्याने माझे हात हातात घेतले आणि मला जवळ बसवले .मी त्याच्या कडे आणि कृष्ण सखा माझ्या कडे ,इतके अपरंपार पाहीले की त्याचे आणि माझे मन अगदी एक होऊन गेले .एक मन , एक विचार, एक शरीर ,....एक आणि एक.... तो आणि मी वेगळे नव्हेच अगदी एक .पुन्हा बासरीचे कर्णमधुर स्वर कानी पडू लागले .त्या स्वरात मी त्याच्याशी पूर्ण एकरूप झाले .जंगल ,पाण्याचा ओढा ,ते शुभ्र फुलांचे झाड ,आणि मी सर्व काही तोच ,माझा श्रीकृष्णमय झाले ......
पूजा म्हणजे अजून वेगळे काय असते ? हीच ती मानस पूजा ...............ज्यांना आवडली त्यांनी जरूर करून पहा आणि मला अनुभव सांगायला विसरू नका.
सोनाली जोशी लिखितकर

चला पार्टीला जाऊ या

चला पार्टीला जाऊ या
अगदी ४,५ दिवसापुर्वीची गोष्ट बघा . ऑफिसमधून घरी आल्या आल्या मिस्टर म्हणाले अग ,ऐकलंस का ? परवा आमच्या ऑफिसमध्ये पार्टी आहे .तुला पण बोलावलंय . संध्याकाळी ७ वाजता जायचय. तर मी ६.३० ला घरी येईन ऑफिस मधून आणि लगेच निघू आपण .तू तयार रहा .असे यांनी म्हणता क्षणीच माझ्या डोक्यात विचार आला ,कपडे काय घालावेत ?
मी --अहो , मी साडी नेसू की ड्रेस घालू ?
अहो -- ड्रेस चालेल की .....
मी -- कोणता घालू?
अहो - अग तुझे , ड्रेस तुलाच माहिती.
मग मी अगदी लहान मुलासारखी ,  मी भाजी फोडणीला टाकली आहे  हे विसरून कपड्यांच्या कपाटाकडे धावले .२, ४ पंजाबी ड्रेस कडे नजर टाकली . हा पांढरा, फारच साधा वाटतोय . हा लाल अगदीच तडक भडक ,नव्या नवरी सारखाच  वाटेल. हा निळा जरा बरा आहे पण तितका खास नाही .हा काळा चांगला आहे पण सध्या एवढ्या लाँग top ची fashion  गेलीय  .त्याला शिवून पण ६,७ वर्षे झालीत .अहो जरा इकडे या ना .सांगा ना मला काय घालू ?
अहो---  अग बघ ना जरा चांगल्या पैकी. असे म्हणत त्यांनी कपाटात डोकावले .बाप रे केवढे ड्रेस झालेत ग . जागा पुरत नाहीय ठेवायला. मला तर वाटतेय तू जन्मभर कपडे नाही विकत घेतलेस तरी पुरतील तुला . त्यांचे हे वाक्य कानावर पडताच मी डोळे वटारले .. काय म्हणालात ? माझ्या मैत्रिणीन कडे तर २, ३ कपाटे भरून ड्रेस आणि साड्या आहेत . तुम्ही लग्न झाल्यापासून एवढ्या वर्षात फक्त पहिल्या लग्नाच्या वाढ दिवसाला साडी घेतली होती .त्यानंतर इतके वर्षात एक तरी साडी घेतलीत का?  
अहो--- अग पण तू मला सांग? तू इतके वर्षात साड्या किती वेळा घातल्यास ? सांग की ?
मी--- माझ्या डोहाळे जेवणात , मग माझ्या भावाच्या लग्नात , तुमच्या बहिणीच्या लग्नात , ;१  २ जणींच्या मंगला गौरीला , आणि दर वर्षी लक्ष्मी  पूजनाला 
अहो --.म्हणजे  तूच हिशोब कर ५अधिक १२ म्हणजे  अंदाजे  १७ वेळा तू या १२ वर्षात साडी घातलीस .आणि तुला किती साड्या आहेत ?
मी --खालच्या मानेने उत्तरले. २२ आहेत .
अहो- मग तुला साडी घेण्यापेक्षा पंजाबी  ड्रेस घेतलेले बरे नाही का?
मी - पण मग आता पार्टीला कोणता घालू ?
अहो - हा चांगला आहे की लेमन कलरचा
मी --- पण याची ओढणी सापडत नाहीय बरेच दिवस
अहो--- मग हा पिंक
मी --याची सलवार फाटलीय
अहो--- मग फेकून दे हा ड्रेस
मी --पण हा ड्रेसचा कलर  खूप गोड आहे .मी दुसरी सलवार . नवीन कापड घेऊन शिवायला टाकणार आहे 
अहो --- अरे रामा, मग हा कसा  आहे बांधणी ?
मी --अहो आता काय बांधणीचा घालू पार्टीला येऊ का ? किती ऑड  वाटेल? लोकं म्हणतील काय घरचाच घालून आली का ही  बाई ? मग हा घालू का ,तपकिरी आणि त्यावर काळी फुलं .
अहो - बर ठीक आहे .पण त्यावर पर्स पण काळीच घे हा.
मी --पण माझ्या कडे तर आता फक्त लाल आणि पांढरीच आहेत .मागच्या वेळेला तुमचीच बहिण म्हणाली , वहिनी ही पर्स किती छान आहे ना काळी ...मी घेऊ का? ,मग मी काय नाही म्हणणार ?  आता माझ्या कडे जरा काही दिसलं चांगल,  की तुमची बहिण विचारणारच लगेच ..वहिनी अग ह्या बांगड्या किती मस्त आहेत ,ड्रेसला पण सुट होत आहेत .नेऊ का?  आणि मागच्या वेळी तर कहरच केला वन्स नी .चक्क माझे सोन्याचे नेकलेस नेले मला ना विचारता , एका लग्न करता आणलेले  .तुम्हाला मी काही बोलले नाही  तेव्हा ,पण माझा जीव नुसता गेला २ दिवस .की कुठे हरवले चांगले ३ तोळ्याचे .मग २ दिवसांनी नणंद बाईंचा फोन आला ,अग वहिनी तुझे नेकलेस मी नेलंय हा घालायला.  खर तिला चांगले झापायचे होते मला पण ,नेकलेस मिळालाय या खुशीत ,वर वर तिला म्हणले .अग त्यात काय ने खुशाल . जळल मेल लक्षण........ .काय बाई एक एक लोकं असतात . आता माझ्या या सगळ्या वक्तव्यावर अहो अगदी मुग गिळून गप्प होते .तसेही त्यांच्या बहिणीला ,आईला काही म्हणले की ते असेच बसतात. हुप्प ....ते गप्प म्हणल्यावर माझे तोंड अजून सुटले .त्या लेमन ड्रेसची ओढणी पण तुमच्या बहिणा बाईनीच   नेली असणार नक्की सांगते. 
 अहो - - पण मग आता परवा ड्रेस कोणता घालतेस ? तुझ्या कडे लाल पर्स चांगली आहे ना तिलाच माच होईल अस ड्रेस घेऊ या मग ...तसेही खूप दिवसात राणी सरकारानाकरिता कुठे काही घेतलंय? तू एक काम कर उद्या माझे ऑफिस सुटण्याच्या वेळेस तिथे ये मग आपण दोघे जाऊ लक्ष्मी रोडला .आणि घेऊ एखादा मस्त ड्रेस पर्स ला सुट होणारा .तीच पर्स घेऊन ये .आणि मग बाहेरच जेऊ .
असे म्हणल्यावर मग माझी कळी  एकदम खुलली .मग हळूच लाडाने त्यांना चापटी मारत मी म्हणले ,पटवता भारी येत तुम्हाला.
पण आजचा स्वयंपाक राहिलाय अजून .आणि डोक्यात ट्यूब  पेटली . अरे  बाप रे मी भाजी खालचा गस चालूच ठेवला होतं .आता करपलीच  असेल  भाजी .तेवढ्यात सासुबाईचा  आवाज आला .अग ,जेवायला बसू या का?  झालय सगळ . मी जाऊन पहाते तर भाजी  कडे नीट पाहून बाकीचाही कुकर वगेरे केले होते.   मग हळूच माझ्या कडे पहात हसत त्या म्हणाल्या झाली का ड्रेसची पसंती , पार्टी करता ? मी नुसतीच हसले .आणि मनात म्हणाले तशा सासुबाई पण चांगल्याच आहेत माझ्या .!!!!!!!!!!!!
 सोनाली जोशी लिखितकर

Monday, March 7, 2011

मला काय करायचे आहे ?

मला काय करायचे आहे ?
रोज सकाळी गजर लावून उठायचे .त्रासिक चेहऱ्याने गजर बंद करायचा. मग पुन्हा ५ मिनिटाने ,आता उठल्याशिवाय भागणार नाही म्हणुन वैतागत उठायचे .प्रातर्विधी आटोपून चहा करायचा .उभ्या उभ्याच प्यायचा .मग मुलांना  उठवायचे .त्यांचे डबे करता करता त्यांचे आवरायचे .डबे भरून मुलीला  शाळेत पाठवायचे .मग पतीराज आळस देत उठणार  .२,४ गोष्टी त्यांना ऐकू जातील अशा बेताने पुट पुटत, "घरात माझ्याशिवाय, कोणीही इकडची काडी  तिकडे करणार नाही", असे म्हणत पसारा आवरायचा. मग पुन्हा एकदा चहा ,नाश्ता सुरु. पति राज आटोपून ऑफिसला गेले की कपडे वॉशिंग मशीनला लावायचे. सासू बाई ,सासर्यांना चहा ,नाश्ता ........मग आपण नाश्ता खायचा .मग दुसऱ्या मुलाचा अभ्यास घ्यायचा .मग अंघोळ .मग २ मिनिटात पूजा .....पूजेतही ,नंतर काय काम करायचं याचा विचार.मग स्वयंपाक.  दुसऱ्या मुलाला  शाळेत पाठवायचे .मग कॉम्पुटर सुरु करून मेसेज पाहणे .मग फोन वरून वेळा  ठरवणे .लोकांच्या समस्या ,अभ्यास करून ठेवणे .त्यावर उपाय लिहून ठेवणे. फोन वर नवीन वेळा घेऊन टायमिंग फिक्स करणे.  मग घाईत जेवण करणे .मग थोडा वेळ फेसबुक. मग मुलगी ; शाळेतून येणार .मग तिचे जेवण . मग थोडा वेळ दोघींचा आराम .मग पुन्हा ४ नंतर आलेल्या लोकांशी बोलून त्यांचे समाधान करणे. एखाद्या व्यक्तीला जेव्हा त्याच्या समस्येचे उपाय सांगेन किंवा त्यांचे दडपण कमी करेन तेव्हा मनात एक आनंदाची लहर उमटते. .............मग पुन्हा संध्याकाळी मुलगा आला की त्याच नाश्ता .मग पुन्हा जेवण बनवणे .मग अहो येणार ...मग सर्वांची जेवणे ...मग मागचे सर्व आवरून एखादी T.V. वरची सीरिअल पाहे पर्यंत डोळे मिटायला लागतात .मग रिमोट नेच T.V. बंद करून आडवे व्हायचे. ...........पुन्हा सकाळी गजर ...........काय आहे हे ...........हे कोणते जगणे आहे... सतत रोज रोज ....तेच..........एक आहे; ......जगातल्या अनेक दुखी कष्टी लोकांपेक्षा आपले जगणे खूप चांगले आहे .पण..........मला अजून काहीच करायचे नाहीय का? असेच माझे आयुष्य जाईल की अजून काही करायचे आहे मला ........काही दिवसांपासून असा विचार सतत मनात येत होता.मग मी ठरवले एक दिवस दुपारी शांतपणे बसून मला माझ्या आयुष्यात काय करायचे आहे हे ठरवले. आता आपले आयुष्य  किती आहे आणि सर्व गोष्टी जमतील की नाही ही गोष्ट निराळी .पण विचार तरी करून पाहायला काय हरकत आहे.
 १) पहिली गोष्ट ; मला माझे शरीर सुदृढ बनवायचे आहे .निरोगी आणि उत्साही .......त्याकरिता मला रोज सकाळी फक्त अर्धा तास लवकर उठावे लागेल आणि थोडा व्यायाम आणि प्राणायाम करावा लागेल .
२) दुसरी गोष्ट मला माझ्या आयुष्यात नव नवीन देश आणि जागा पहायच्या आहेत .आणि त्यावर माझे अनुभव माझ्या वाचकांकरिता लिहायचे आहेत.  ज्यातून त्यांना आनंद मिळेल आणि मार्गदर्शनपण   आता ही माझी अतिशय प्रामाणिक इच्छा आहे या करिता खूप उशीर करून चालणार नाही कारण शरीर थाकायाच्या  अगोदर म्हणजे किमान ५० ते ५५ वयाच्या च्या अगोदर  .......पण याकरिता भरपूर पैसे लागतील जे माझ्याकडे नाहीत. .पण मी काही भाग काटकसर करेल .आणि जे माझे मित्र मैत्रिणी परदेशात राहतात .त्यांच्यापैकी ज्यांच्याकडे मी आणि माझे पति ४, ५दिवस राहू शकू .अशा मित्र मैत्रिणीची मदत घेणे. 
३)तिसरी गोष्ट जेवढे थोडे फार  अध्यात्मिक वाचन झालेले आहे आणि जेवढे माझ्या गुरुनी सांगितले आहे त्याप्रमाणे रोज किमान अर्धा तास ध्यान धारणा किंवा आत्म परीक्षण करून स्वतःची अध्यात्मिक उन्नती करून घेणे. माझी मुले मोठी झाल्यावर या करिता वेळ काढू .असा विचार पहिल्यांदा आला .पण अध्यात्म सांगते की उद्या कधी उगवत नाही .आजच आहे .म्हणुन जेव्हा जमेल तसे पण लगेच सुरु करणार.
४)माझ्या मुलांवर चांगले संस्कार घडवून त्यांना त्याच्या पायावर उभे करणार .या करिता मात्र  प्रत्येक क्षणी दक्षच राहावे लागेल .पण नंतर मात्र त्यांच्या संसारात लुडबुड करण्यापेक्षा अळवावरच्या पाण्याप्रमाणे संसारात असून नसल्यासारखे परमेश्वराच्या आराधनेत जीवन घालवणार . 
असे सध्या तरी डोक्यात आहे .........पाहू पुढे काय काय आहे ..........मला वाटते प्रत्येकाने अशी जर स्वतःच्या जीवनाची उद्दिष्टे लिहून काढली तर जीवन म्हणजे आला दिवस गेला दिवस असे ना राहता, ते  आपल्या उदीष्ट  पर्यंत  पोहोचण्याचा मार्ग बनेल आणि माणूस म्हणून जन्माला आल्याचे सार्थक होईल ."या सर्व गोष्टीत कटाक्षाने सातत्य ठेवणे महत्वाचे आहे ".वरील गोष्टी या माझ्या स्वतःच्या वैयक्तिक उद्दिष्टे आहेत पण याचा अर्थ असा नाही की ती आदर्श आहेत  किंवा तशीच असावीत .पण जी असतील  आणि त्याकरिता  आपल्याला काय काय करावे लागेल याचा जाणीवपूर्वक विचार करा आणि त्याप्रमाणे वागा .आणि ज्यांना माझा हा विचार आवडला हे

Thursday, February 10, 2011

सिक्कीमचा 'दावा गेन्झे बुतीया '

सिक्कीमचा 'दावा गेन्झे बुतीया '
दरवर्षी मी कुठे ना कुठे भ्रमंती करत असते .बरेच दिवसात जर कुठे गेले नाही तर मला चैनच पडत नाही .या वेडापायी वेळ ,पैसे काहीही खर्च झाले तरी बेहत्तर .... 
तर या वर्षी मी ईशान्येकडच्या भारताचे दर्शन घ्यायचे ठरवले होते .म्हणून नेटवरून आणि पुस्तके वाचून माहिती गोळा करायला सुरवात केली . ही अशी वेळखाऊ कामे करणे, माझे पती उदार मनाने माझ्याकडे सोपवतात .त्यात मलाही आनंद मिळतो आणि उद्या कुठे बाहेरगावी गेल्यावर काही प्रोब्लेम  आला तर माझे तोंड आपोआपच बंद राहते कारण प्लानिंग  माझे असते ना.........तर मग या वर्षी उन्हाळ्यात थंड होण्यासाठी आम्ही (म्हणजे मीच) सिक्कीम ची निवड केली .यात आम्ही दार्जीलिंग ,गंगटोक,पेलिंग आणि कालीमपोंग अशी चार ठिकाणे पाहणार होतो .या मध्ये सुरवातीस आम्ही दार्जीलिंगचा चहा प्यायचे  ठरवले होते.म्हणजे पहिला मोर्चा दार्जीलिंगला.  दार्जीलिंगला चहा फक्त चहाच्या मळ्यातच पाहणे परवडते .तो घेण्याएवढी आपली ऐपत नसते .कारण तिथे दुकानदार म्हणतात ७००,८०० रुपयाला १ किलो चा चहा काय कुणीही घेईल त्यात मजा नाही. साधारण पणे ३ ते ४००० रुपये किलोचा चहा चांगला असतो .असे म्हणल्याने आम्ही फक्त तो चाय की बागान मधेच पाहून घेतला. पण थंडी मात्र इथल्यासारखी मी भारतात इतरत्र अनुभवली नाही अगदी मे महिन्यात सुद्धा हाडे गोठवणारी थंडी होती तिथे .पण मी तुम्हाला दार्जीलिंगचे प्रवास वर्णन नाही सांगणार आहे ,पण तिथे आलेल्या एकाहून एक जिवंत आणि समृद्ध अनुभवांची शिदोरी उघडणार आहे 
.दार्जीलिंग पाहून झाल्यावर आम्हाला पेलिंग येथे जायचे होते . त्यामुळे सकाळीच  सर्व आटोपून आम्ही  गाडीची वाट पाहू लागलो. या भागात प्रत्येक ठिकाणी वेगळी गाडी ठरवावी लागते म्हणजे दार्जीलिंगची गाडी गंगटोकला चालत नाही. म्हणून रोज वेगळी गाडी नि वेगळा ड्रायवर असे .गाडी तर आजच्या ड्रायवरने फारच छान मेंटेन केली होती .तो साधारण इकडच्या  लोकांच्या प्रमाणे विशिष्ट चेहरेपट्टीचा ,साधारण ४०,४५ वयाचा असावा . ५ मिनिटांनी स्थिरस्थावर  झाल्यावर त्याला तुमचे नाव काय ? कुठले आहात ? अशी विचारणा केली .त्याने सांगितले माझे नाव दावा गेन्झे बुतीया आहे. आता माझा स्वभाव मला स्वस्थ बसू ना देणारा ,म्हणून त्याला विचारले तुम्ही पेलिंग ला जाऊन आज परत येणार का ? त्याने हो म्हणले. आणि गाडीमध्ये अतिशय सुंदर गाणी त्याने लावली ,काही रोमांटिक काही शास्त्रीय  पण सुमधुर ,चहाच्या त्या हिरव्यागार वळणदार बागांमधून आमचा प्रवास अतिशय मस्त सुरु होता .शेजारी माझे  पती आणि मुलगा. आसमंतात पसरलेला काहीसा मंत्र मुग्ध करणारा गारवा, ती गोड गाणी ,आणि मैलोन्मैल पसरलेले चहाचे मळे. याहून स्वर्ग सुख काय वेगळे असते ......मधेच माझ्या मनात विचार आला हे बिचारे पहाडी लोक ,यांना आयुष्यभर याच वळणदार वाटांमधून गाडी फिरवणे या शिवाय बाहेरचे जगच माहित नाही.  पण मला माहित नव्हते . आज मला खूप वेगळा एक अनुभव मिळणार आहे आणि तो पण या साध्या  सुध्या  ड्रायव्हर ... कडून. ज्यांच्याकडे आपले विशेष लक्षही नसते. वाटेत जाता जाता  बरेच गाव वाले त्याला हात करत होते .
 मी त्याला म्हणले "काय हो ,तुमची बरीच मित्र मंडळी आहेत वाटते " .
तो म्हणाला," हा दीदी ,हर किसीसे हसकर  बात करे ,सबकी मदद करे,तो जिंदगी आसानीसे कटती है"|  किती साध्या शब्दात आय्ष्याचे तत्वज्ञान एका पहाडी माणसाकडून मला ऐकायला मिळाले होते .नंतर मग आमच्या गप्पाच सुरु झाल्या . मी त्याला विचारले हे दावा गेन्झे म्हणजे काय? तो म्हणाला मी सोमवारी जन्मलो म्हणून आमच्या कडे दावा असे नाव ठेवतात. आता त्यांची भाषा नक्की धड माहित नसल्याने मी आपले जेवढे मिळाले ते सामान्य ज्ञान झोळीत भरून घेतले .मग माझी गाडी त्याच्या घरच्यांवर घसरली ."तुमच्या घरी कोण कोण असते" ?
तो म्हणाला ,मी आणि माझी आई .
" तुमचे लग्न नाही झाले? "अगदी सहज माझ्या तोंडावर प्रश्न आला
".हो झालेय पण डिवोर्स झाला ."
माझ्या तोंडाचा 'आ' झाला . काय??? तुमच्याकडे पण डिवोर्स होतात?
माझ्या पतीदेवानी माझी पुढे जाणारी गाडी थांबावी म्हणून मला खुणा करायला सुरवात केली .
पण इतकी इन्टरेस्टिंग  गोष्ट ऐकायला मिळणारी संधी कोण सोडेल? 
मग माझी गाडी मी पुन्हा पुढे दामटली .अब वो कहा है?  " तो उत्तरला "जर्मनी मे ".
जर्मनी........ मला तर आश्चर्याचा  झटकाच  बसला. मी विचार केला याच्या बायकोने इथे एखादा जर्मन पटवला  की काय?
तो म्हणाला ,बहनजी वो उधर  नौकरी करती है  .वह तो जर्मन है ना|
 मी आणि आमचे अहो दोघेही सावरून बसलो आणि जीवाचे कान करून त्याची ही जगावेगळी कहाणी ऐकू लागलो . पण ही गोष्ट अशी तशी नव्हे ; स्वत:  जगलेली . आता या दोघांचे लग्न कसे झाले असेल ;ही मोठी उत्सुकता माझ्या मनात होती .
तो म्हणाला, " मै  गया  था उधर घुमने के लिये ९२ ,९३ मे |उधर हम दोनोका प्यार हो गया.| हमने शादी करली| फिर एक लडका हुआ |  मी २,३ साल उधर रहा. लेकीन उन दिनो मे जर्मनीमे प्रोब्लेम्स थे .बाहर वाले लोगोंका रहना  मुष्किल था |मैने उसको बोला ,"भारत चलते है |हमारे देशमे  ऐसा कोई   प्रोब्लेम नही" |लेकीन वो उसका देश नही छोडना चाहती थी| और मुझे लग  रहा था अपने देस जैसी  सुरक्षा  वहा नही है  | और मै यह  आ गया| मेरा बेटा आया था २,३ बार यहा|  उससे कभी कभी बात  होती है फोनपे | लेकीन उसके बाद बिवीसे   कभी नही मिला और वह भी नही आइ" |
मी पुतळा होऊन त्याची जीवनकहाणी ऐकली. खरेच प्रत्यक्षात फिल्मी कहाणी जगलेली व्यक्ती ,जी परदेशात मिळणारी ऐषोआरामी  साफ सुथरी जिंदगी सोडून स्वदेशात निर्धोक पणे हक्काने जगण्यासाठी आपल्या कुटुंबाला सोडून परत आली होती आणि आपल्या म्हाताऱ्या आई बरोबर जीवनाची उर्वरित वाटचाल दुसऱ्या   माणसाना मदत करून निवांतपणे करत होती .
जर्मनीमध्ये आम्ही पण २००० साली  होतो ७,८ महिन्यांकरता .दावा गेन्झे ला जाणवलेली असुरक्षितता आम्हाला कुठेच जाणवली नव्ह्ती ;एवढेच नव्हे तर एक नितांत सुंदर रमणीय आणि पुन्हा पुन्हा साद घालणारा तो देश याची आम्हाला नेहमीच उत्सुकता वाटते म्हणून जास्तच रस घेऊन मी त्याची कहाणी ऐकली होती खरे तर त्या दोघांचे प्रेम कसे जमले हे पण मला विचारायचे होते .पण सध्याची त्याची परिस्थिती पाहता मला त्याच्या दु:खा वरची खपली काढवेना. 
तेवढ्यात एक टायर पंक्चर झालेली गाडी वाटेत दिसली. दावा म्हणाला मी थांबून जरा मदद करू का ? आम्ही त्याला होकार दिला .पंक्चर काढायला वेळ लागत होता म्हणून मी वाटेत दिसत असलेल्या रंगीत नावाच्या नदी चे सौंदर्य ,खोलवर असलेली दरी आणि त्यातून वाहणारी 'रंगीत' नदी पाहू लागले आणि जोरदार वाहणाऱ्या तिचा खळाळता प्रवाह पाहता पाहता माझ्या डोळ्यातील बांध  घातलेल्या भारतीय अश्रुना तिच्या प्रवाहात सामावून टाकले.....................

दगडफूल

दगडफूल
सहजच जुन्या आठवणी आल्या . पण फार जुन्याही वाटेनात.  मी असेन तेव्हा साधारण  सातवीत किंवा आठवीत. तेव्हा पावसाळा होता. मी शाळेत नवीनच प्रवेश घेतला होता . पण तशा ४, ५ मैत्रिणी होत्या . शाळेत जायचे म्हणजे शाळेचे मैदान ओलांडून जावे लागायचे.  आणि ते मैदान म्हणजे शेतजमीनच होती . पावसाळ्यात असा चिखल व्हायचा म्हणता कि बोलायची सोय नाही. एक पाऊल टाकले कि ते अर्धा फुट आत जायचे आणि वर काढले कि चपलेला मोठा चिखलाचा गोळा चिकटून मगच चप्पल बाहेर यायची. शेवटी वर्गात पोचेपर्यंत चप्पल फुट फुट उंच झाल्या असायच्या. बरे तेव्हा बूट वगेरे भानगड नव्हती. मग दिवसभर पाऊस असाच वेड्यासारखा कोसळायचा. मग पाणी वर्गाच्या छतातून टपकायला लागायचे . कधी या बाकावर तर कधी त्या बाकावर .... मग प्रत्येकजण बाके सरकवून बसायचे .आणि गम्मत म्हणजे मग कधी कधी आमच्या बाई बाके जोडून बसायला सांगायच्या . आमची शाळा मुलामुलींची होती. आणि तेव्हा हल्लीसारखे मुले मुली बोलत नसत  . वरून पावसाचे पाणी टप टप गळत असे. दरवाज्यातून ,फुटलेल्या काचातून पावसाचे  पाणी आत येत असे.
असे कधी कधी खूप छान  वाटायचे . कोणाचेच लक्ष नसायचे कि बाई काय शिकवत आहेत. गारठ्याने कधी कधी दात वाजायला लागायचे . त्यातच काही मुलांचे नि मुलांचे एकमेकांकडे चोरून पाहणे सुरु असायचे .ते क्वचित माझ्याही लक्षात यायचे . मग आमच्या  मैत्रीणीना  गुप्त बातमी कि कोणाचे कोणाशी काय चालू आहे . पण हे सगळे अगदी निष्पाप पणे हं.  हल्लीच्या मुलांएवढे  जनरल नॉलेज आमचे नव्हते. असेच कसेतरी पहिले ५ तास संपायचे . मग २०, २५ मिनिटाची सुट्टी असे . सुट्टी झाली रे झाली कि आम्ही ४,  ५ मैत्रिणी मागच्या गेट मधून जाऊन एक  रस्ता  ओलांडून बाहेर पळायचो . त्या रस्त्या पलीकडे एक मोठे खडकाळ मैदान होते . पुढे एक जरा खोल असा भाग होता . त्यातून पावसाळ्यात ओढ्यासारखे पाणी वाहायचे .ते पाणी पहात राहणे हं आमचा आवडता छंद  होता . मध्ये बरेच उंच गवत उगवले होते. त्या खडकाळ आणि पावसाने  शेवाळे उगवून बुळबुळीत झालेल्या खडकांवर आम्ही बसायचो.  पाण्याकडे पाहायचो. त्या खोल पाण्यत आणि शेजारच्या उंच खडकांमध्ये जेमतेम एक फुटाची अशी चिंचोळी पट्टी होती. त्या चिंचोळ्या पट्टी वरून  कसाबसा पाय सावरत एका हाताने खडकाचा आधार घेत आम्ही दोघी तिघी पलीकडेपर्यंत जाऊन यायचो. तिथे काही खडकांवर दगड्फुले उगवली होती . खरे म्हणजे आमच्या दोघी तिघींचा; ती मसाल्यात वापरतो ती  दगड्फुले आहेत कि नाही यावर मतभेद होत असे. आता कॉलेजमध्ये मी जेव्हा वनस्पती शास्त्राची   पदवीधर झाले. तेव्हा कळले कि ती खरोखरच दगड्फुले होती. बऱ्याच वेळा आजही मसाला बनवण्याकरता दगड्फुले विकत  घेते तेव्हाही  मला ती शाळेमागच्या  धबधब्या जवळची आठवतात . आणि वाटते या क्षणी परत तिथे जावे   मैत्रिणीबरोबर  .पण आता इथे कोणीच नाही साऱ्या लग्न होऊन सासरी वेगवेगळ्या  गावांना गेल्या . मी पण संसारात अडकले . पण त्या आठवणी अजूनही मला हळुवार करतात.  संसाराच्या व्यापामुळे मला तिथे जाता येत नाही . आणि कदाचित या वयात त्या वाटेवर चालता येईल कि नाही हे पण सांगता येत नाही  . तेव्हा वाटत  माझ  मन पण झालय एक दगडफूल ;...............  खडकावरच आपलं  जीवन जगणारं ...........
सोनाली जोशी लिखितकर

अखेरचा हा तुला दंडवत -भाग २

अखेरचा हा तुला दंडवत -भाग २
माझ्या मित्र मैत्रीणीनो तुम्ही दिलेल्या उत्तम प्रतिसादाने मला लगेचच पुढचा भाग लिहायला उद्युक्त केले आहे. मग पहा आता काय झाल पुढे ...............
छोम्गो लेकच्या अवघड घाट रस्त्यावर आम्ही गाडीसकट जात होतो .म्हणजेच आम्ही गाडीत होतो आणि आमची गाडी चालली होती. जोरदार पाऊस आणि त्याच्या जोडीला लिंबाच्या आकाराच्या कधीही न पाहिलेल्या गारांचा  एवढा मोठा वर्षाव यांच्या मुळे आम्ही एकाच वेळी थोडे घाबरलो आणि थोडे आनंदात होतो . पण ड्रायवर ज्या आत्मविश्वासाने काहीही न दिसणाऱ्या काचेतून जी गाडी चालवत होता ते बघून मी त्याच्यावर ओरडायला लागले.  अहो गाडी जरा वेळ साईडला घ्या . समोर दरी आहे की काय आहे. काहीही  दिसत नाहीय.
पाऊस आणि गारांचा असा न भूतो न भविष्यती मारा बघून आमचा थरकाप उडू लागला . त्या माऱ्या मध्येसुद्धा  त्याने   २० मिनिटे गाडी चालवली पण अचानक समोरच्या गाडीवाल्याने त्याची गाडी थांबवली . कारण त्याला त्याच्या गाडीला वायपर असूनही काही दिसेनासे झाले होते . पण बरे झाले; एकदाचा हा थांबला तरी,....... असे म्हणून आम्ही जरा विसावलो .घड्याळात सहज लक्ष गेले .दुपारचे २ वाजले होते. हॉटेलवर पोचायला जरा उशीर होणार .आणि मग संध्याकाळी ५ वाजता बंद होणारी  केबल कार राइड ची सफर आम्हाला करता येणार नाही की काय या विचारात मी चरफडू लागले. 
अशा जोराच्या गारपिटीने आमच्या पुढच्या सर्वच गाडया थांबल्या . असा जोरात गार-पाऊस दीड तास कोसळला .सर्व लोकं आपापल्या गाड्यात बसून पाऊस थांबण्याची वाट पहात होते .पाऊस थांबल्यावर सर्वाना हायसे झाले. गाडीच्या काचा उघडून आम्ही बाहेर पाहीले तर काय सगळीकडे पांढरे शुभ्र .....   समोरची गाडी आमच्यापासून ३०,४० फुटावर थांबली होती . बाहेर गारपीट झाल्याने वातावरण अतिशय गार झाले होते. पण बाहेरच्या दरी आणि डोंगरावर जी हिम कणाच्या  शालीची दुलई पसरली होती ती जरा बाहेर उतरून पहावी म्हणून मी गाडीचा दरवाजा उघडला . खाली पाय ठेवला तर काय ...........पाय घसरू लागला .चक्क पायाखाली बर्फाचा थर जमा झाला होता . मला तर हर्ष वायू व्हायचे बाकी राहिले होते. फार पूर्वीपासून अगदी शम्मी कपूरचे ,याहू सारखे सगळीकडे बर्फ असावे ,किंवा अमिताभच्या चित्रपटाप्रमाणे ये कश्मीर है ,ये कश्मिर है ............ असे गाणे आपणही कधीतरी बर्फामध्ये  म्हणावे अशी माझी अतृप्त   इच्छा होती तीच देवाने पूर्ण केली असे मला वाटले. माझ्या प्रमाणेच बऱ्याच जणांची  अवस्था झाली असावी .काही जणांनी गाडीतून उतरून VIDEO SHOOTING  सुरु केले आम्ही पण काही फोटो घेतले . येताना जे डोंगर  उघडे बोडके दिसत होते .त्यावर अगदी स्वित्झर्लंड    प्रमाणे  बर्फ पसरले होते . अतिशय हर्ष भरीत झालेले प्रवासी आणि त्यांचे रंगीबेरंगी स्वेटर , सर्वांचे प्रफुल्लीत चेहरे या मुळे वातावरण अतिशय रोमांचक झाले होते. माझ्या मनात आणि ओठावर सुद्धा अगदी एकामागून एक गाण्याच्या लाटा येत होत्या  .एक  था गुल और एक  थी बुलबुल  -शशी कपूर नंदाचे ;
तू मेरे सामने ,मै तेरे सामने ;शाहरुख आणि जुहीचे.......... काही विचारू नका ..........
.ड्रायवर अचानक उतरून कुठेतरी गायब झाला होता .  मी त्रासिक मुद्रेने अहोंना प्रश्न केला, कधी सुरु होणार  गाडी ? त्यानाही काहीच कल्पना येत नव्ह्ती . अचानक ड्रायवर उगवला .त्याला आम्ही प्रश्न विचारून बेजार केले .कधी जायचे आता ?थांबला की पाऊस ............ पण त्याचे एक नाही की दोन  नाही .मधून मधून बहिरा होता की काय कोण जाणे. .............. ये गाडी कब चलेगी ? मी निर्वाणीचे त्याला विचारले .तो म्हणाला "जब ये बरफ पिघलेगी. " मी विचारले ,कब पिघलेगी ? तो म्हणाला जब  सुरज  निकलेगा .......तब..........माझा आवाज बंदच झाला. अहो पण याच्यावरच गाडी चालवा की ........माझ्या या प्रश्नाचे प्रात्यक्षिका सह  उत्तर मला समोरच्या गाडीवाल्याने दिले .कारण त्याने गाडी सुरु केली पण एक  फुट सुद्धा ती जाऊ पुढे शकली नाही कारण ती एक फुट बर्फामध्ये रुतली होती .त्यांच्या ,आमच्या आणि सर्व लोकांच्या गाडया  अशाच बर्फामध्ये रुतून बसल्या होत्या . आता मात्र आमचे धाबे दणाणले . आता संध्याकाळचे ५ वाजले होते. हवा तर इतकी ढगाळ होती की ऊन पडणे शक्यच नव्हते .  आम्ही विचार करू लागलो इकडे जवळच मिलिटरी चे कॅम्प असतील. आपल्या मदतीला  नक्की कुणीतरी  येईल . बहुतेक गाड्यांचे ड्रायवर बाहेर पडून काय करता  येईल याचा विचार करत असावेत. आमच्या मागे ३, ४ गाडया दिसत होत्या आणि पुढे १ गाडी. कारण त्यानंतर वळण होते . आणि पुढे जाणे शक्य नव्हते  कारण बर्फावर चालता येत नव्हते. पाय घसरत होते. एकही मिलिटरीचा   जवान दिसत नव्हता. आम्ही गंगटोक पासून ३२ किलोमीटर लांब होतो .जिथे सर्व काही व्यवस्थित असतानाही गाडया २० ते ३० किलोमीटर पेक्षा जोरात जाऊ शकत नाहीत .तिथे आम्ही अशा ठिकाणी अडकलो होतो. 
'काळे कुट्ट आभाळ .........,आम्ही जवळपास  १०,००० हजार फुट  उंचीवर .........,समोर दऱ्यांमध्ये कोसळणारे भीषण धबधबे ,..........तर उजवीकडे केव्हाही दरड कोसळेल अशी भीती.........कारण पावसामुळे सर्व ओले झालेले .कोणाच्याही मोबाइलला रेंज नाही. कोणीही मदतीला येत नाहीय. आणि आणि आम्ही इकडे अडकून पडलो आहे . हे जगात फक्त आम्हालाच माहित आहे.............'आमचे आई वडील ...........काय माहित त्यांना ..............
  हे सर्व वातावरण केवळ आणि केवळ प्रलय काळाची   आठवण करून देणारे होते. डोके बधीर झाले होते .कुणावर चिडावे हेच कळत नव्हते . हवा अतिशय गार म्हणजे आपण फ्रीज मध्ये बसून राहिलो आहे  अशी. अंगात स्वेटर घटला आहे की नाही इतकी थंडी .वरून घेतलेली शाल कशीबशी थंडीशी सामना  करत होती. संध्याकाळचे ६ वाजले . अंधार पडला आता मात्र माझा धीर सुटला .आपण या ठिकाणाहून उद्या पर्यंत निघू शकणार की नाही असे वाटू लागले .आता मात्र मी देवाचा धावा करायला सुरवात केली .माझ्या कृष्णा  ,आम्हाला सोडव. मारुतीराया आम्हाला एका क्षणात गंगटोक  पर्यंत नेऊन पोचव .आमची गाडी सुखरूप पोचू दे. तो दिवस  शनिवार होता .म्हणून त्या पवन सुताची खूपच  आठवण येऊ लागली.  
डोळ्यातून अश्रू झर झरा वाहू लागले . शेवटी मनास शांत करावे म्हणून गळ्यात असलेली तुळशीची माळ काढून मी जप  करू लागले. तेवढाच मनाला आधार .................मग जवळपास अर्ध्या एक तासाने माझे चित्त थाऱ्यावर आले. मग आम्ही चक्क गप्पा मारू लागलो मी माझ्या मुलाशी आणि माझे पती  राजेश यांच्याशी पूर्वी वाचलेल्या एका धार्मिक पुस्तकावर गप्पा मारू लागलो .नेहमीच्या धकाधकीत एकमेकांशी बोलण्या एवढा वेळ असतो कुठे .पण आम्ही तिघेही एकमेकांचे सर्व काही मनापासून ऐकू लागलो . 
काही ड्रायवर लोकांकडे फावडी होती त्यांनी त्याचा एका जीप पासून दुसऱ्या जीपच्या चाकापर्यंत उकरून रस्ता बनवला ,म्हणजे फक्त चाकांपुरता. मग गाडी थोडीशी  हलली आणि २,३ फुट पुढे गेली .सगळ्यांच्या अंगात एक उत्साहाची  लहर पसरली .तेवढ्यात एक बातमी आली की समोरच्या वळणावर एक मिलिटरी ची बस उलटी झाल्यामुळे   वाहतूक थांबली आहे ती एका प्रोक्लोन च्या मदतीने सुलटी करण्यात यश आले होते .एक मिलिटरी ची   गाडी आली होती .  आता लवकरच आपली सुटका होणार असे सर्वाना वाटू लागले . ८ वाजले होते. पण थोडासा चंद्राचा प्रकाश पसरला होता . आता एक मिलिटरीची चाकांना साखळ्या असलेली गाडी येणार आणि ती  गाडया  जाण्या पुरता trak  बनवणार. अशी माहिती कळली . याच मार्गावर जवळपास १५० ते २०० गाडया  अडकल्या असाव्यात . आम्ही तरी लवकर निघालो होतो काही गाडया तर बाबामंदीर किंवा मधेच अडकल्या होत्या . आमच्या पुढच्या गाडीत कोण आहे हे आम्ही जरा  बाहेर पडून विचारले .गाडीत एक तान्हे ६ महिन्याचे बालकही आणि अजून  ६ जण  होते . आमच्या कडे २ बाटल्या पाणी होते ते ड्रायव्हर ला मधून मधून दिल्याने संपले होते . एक बिस्किटाचा पुडा होता .मग आम्हाला लक्षात आले .आम्ही १ वाजता नुडल्स खाल्यानंतर एक थेंब भर   पाणी किंवा एक कण सुद्धा खाल्ले नव्हते   आणि आम्हाला इच्छा सुद्धा होत   नव्हती . .मिलिटरी च्या गदिने थोडा मार्ग बनवला होता आणि आता गाडया थोड्या फार पुढे जाऊ शकणार होत्या .
आता आमच्या गाडीपासून पुढच्या आणि त्यापासून पुढच्या अशा गाडीपर्यंत फावाड्यानी एक चाकांपुरता  मार्ग बनवला आणि त्यावरून चक्क गाडी पुढे गेली ..........१०,१५ फुट .आम्ही आनंदाने ओरडू लागलो . पण आता मात्र पुढे काय आहे हे माहित नव्हते. आता पुढची बस साईडला काढल्या वर एक मोठा चढ होता .त्यावरून आमच्या पुढची गाडी गेली . नंतर लगेचच एक वळण होते .आता आमची पाळी  होती .पण काय कुणास ठाऊक आमची गाडी त्या चढा पर्यंत गेल्यावर बर्फावरून घसरू लागली .गाडीचे ब्रेक बहुतेक नीट नसावेत.    मग पुन्हा प्रयत्न केला ,मग पुन्हा एकदा .असा ५ वेळा प्रयत्न केला .  आम्ही हताश झालो .अचानक एक मिलिटरीचा जवान आला आणि म्हणाला गाडी पहिल्या गेयर मध्ये टाका .आणि काहीतरी झाले पण गाडी  २,४ क्षणात  तो चढ पार करून पुढच्या वळणावर आलीसुद्धा . त्या मारुती रायाचे  आभार हजार वेळा मानले .आता तिथून अंदाजे अर्धा एक किलोमीटर गाडी जाऊ शकली .
आता पुन्हा एकदा गाडया थांबल्या  .का काही कळेना कारण तसेच तर अंधारात काही दिसत नव्हते . पण जरा नीट पाहिल्यावर दिसले पुढे उतरणीचा रस्ता होता  .आणि तो सुद्धा अंदाजे ६० अंश तिरका तरी असावाच किंवा त्याहूनही जास्त .दुसऱ्या बाजूला अतिशय खोल दरी की पडले तर हाड सुद्धा मिळणार नाही .मिलीटरी चे जवान आले होते .पण ते तरी काय करणार ........ आमच्या पुढे ८, ते १० व्या नंबरवर असलेल्या गाडीने जायचा  प्रयत्न केला. अतिशय घाबरत  त्याचा चालक जाऊ लागला आणि नेमकी उतारावर त्याची गाडी बंद पडली . दुसऱ्या एकाने जायचं प्रयत्न केला .दुसऱ्या बाजूला असलेल्या दरीला घाबरत त्याने गाडी खूप साईडला घेतली तर ती गाडी डोंगरच्या बाजूने जी नळी तयार झाली होती त्या नळीत घसरली . त्यातील लोकांना बाहेर यावे लागले . बाहेर शून्य अन्शापेक्षाही कमी तापमान होते. पण या गाडीची अवस्था आघून बहुतेक ड्रायव्हर घाबरले . एक तर गाडया बर्फावर सटकत   होत्या .कडेला संरक्षित कठडा वगैरे काहीच नाही .आणि पडले तर समाधीच.   समोरच्या गाडीने जायचा प्रयत्न केला.पण घाबरून त्या ड्रायवर ने रडायलाच सुरवात केली कारण तो सिलीगुडी हून  आला  होता त्याला एवढ्या अवघड घाटची सवय नव्ह्ती. मग सर्व लोकांनी ठरवले की आता आहे त्याच परिस्थितीत सर्वांनी सकाळ होईपर्यंत बसून राहायचे .सूर्य उगवून बर्फ  वितळेल तेव्हा जायचे .पण ते सुद्धा अवघडच होते . कदाचित या थंडीनेच मारून जाऊ असे वाटू लागले . माझ्या मुलाचे हात पाय अतिशय गार पडले होते . स्वेटर आणि शालीचा काहीच उपयोग होत नव्हता . माझ्या लहान मुलीला आम्ही या ट्रीपला आणले नव्हते .या गोष्टीकरिता मी देवाचे आभार मानले .
ratriche १०  वाजले होते .  आम्ही गारठून गेलो होतो, केवळ एकमेकांना बिलगून बसणे या पलीकडे काहीही करू शकत नव्हतो .पुन्हा कधीही अशा उंचावरची ठिकाणे पाह्यची नाहीत असे हजारवेळा ठरवून झाले. तेवढ्यात एक बातमी आली .की एक मिलिटरी ची  बस  आली आहे .पण ती तो उतार पार करून पुढे १ किलोमीटर अंतरावर थांबली आहे त्या गाडीने लोकांना जाता येईल .त्यामुळे ज्या लोकांच्या गाडया बंद पडल्या आहेत किंवा ज्या गाड्यांचे चालक गाडी चालवू  शकत नाहीत त्यांनी तिथ पर्यंत चालत जावे. मग खुपसे लोकं पायी उतरून ,हातात सामान घेवून चालू लागले .म्हातारे ,लहान मुले ,सर्वच ......... 
पण आम्ही विचार केला जर का त्या बस मध्ये एवढे लोकं मावले नाहीत किंवा अजून काही समस्या निर्माण झाली तर .......त्या पेक्षा आपण आहे या स्थितीतच बसून राहावे. असा २  तास गेले रात्रीचे १२ वाजले  .लोकं जातच  होते. कोणी पडत होते .कोणी उठत होते .फार अवघड परिस्थिती होती. आमचा ड्रायव्हर जो मधेच गायब झाला होता तो धुमकेतू सारखा उगवला .त्याच्या बरोबर एक थोडासा पिलेला माणूस पण होता . पण तरीही पूर्ण शुद्धीत आणि नीट बोलत होता . तो आमच्या ड्रायवरला  म्हणाला ,हा उतार जर तुम्ही पार  केलात तर पुढे काही अवघड नाही पुढचा रस्ता फारसा धोकादायक नाही .असे त्या दोघांचे बोलणे चालले होते. आणि अचानक ड्रायवर म्हणला मी या उतारावरून जाणार  आहे . तुम्हाला पाहिजे तर या नाहीतर मी चाललो . मी नेइन नीट गाडी .  पण आम्ही म्हणले नाहीतर हा पूर्ण उतार आम्ही पायी चालत येतो मग तुम्ही गाडी अन त्यावरून .....कारण तो तिथे थांबायला अजिबात तयार  नव्हता . म्हणाला तुम्ही गाडीत बस जर कुठे प्रोब्लेम वाटला तर मीच तुम्हाला उतरायला सांगेन. पण तो उतार ती महाकाय दरी आणि बर्फावरून घसरणारे टायर. आणि ना ऐकणारा ड्रायवर . मला वाटू  लागले ,आता काही आपले खरे नाही .कदाचित माझ्या निसर्गावरच्या प्रेमामुळे परमेश्वराने माझ्या चिर  विश्रांतीचे हेच ठिकाण निश्चित  केले असावे . माझ्या नंतर माझ्या ५ वर्षाच्या मुलीचे काय होईल .तिला कोण पाहील..... देवा .........आता तूच तिचा सांभाळ करायचा आहेस . आम्ही तिघेही जण एकमेकांच्या कुशीत शिरलो .आता हीच आपली अंतिम भेट ..........कृष्णा तू तरी आहेस ना..........अखेरचा हा तुला  दंडवत
गाडी उताराच्या दिशेने पुढे पुढे जाऊ लागली.  मी डोळे घट्ट मिटले एक हात त्यांच्या हातात आणि एका हाताने मुलास घट्ट धरले. मनामध्ये मारुतीरायाचा धावा सुरु केला हनुमंता ,पवन सुता मी कधी जरी थोडे तरी तुझ्यावर मनापसून  भक्ती  केली असेल तर आम्हाला  सुखरूप या गाडी सकट  गंगटोक ला पोचव . भीम रुपी महारुद्र वज्र हनुमान मारुती ,..........असा जो धावा सुरु केला की काय सांगू अगदी ती २,३ मिनिटे मला काही सुद्धा कळले नाही .आणि ...........
अग आई , अग आई ,डोळे उघड ना आपण त्या उतारावरून खाली  आलो पण ...........माझा मुलगा मला हलवत होता .........माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता . डोळ्यातून घळ घळ अश्रूंच्या धारा सुरु झाल्या .............मी खरच जिवंत होते .आम्ही सर्वजण नीट होतो .आम्ही सर्वांनी ड्रायवर सकट आनंदाचा जल्लोष केला .आणि आमच्या तयार झालेल्या टायर च्या खुणावरून मागची गाडी पण येण्याच्या प्रयत्न करू लागली . आता पुढचा रस्ता फारसा अवघड  नव्हता ..मागच्या गाडया पण हळू हळू येऊ लागल्या . वाटेत बरेच लोकं थांबले होते .त्यांना मिलिटरी च्या गाडीत जागा मिळाली  नव्हती .आपले जवान अशा लोकांना इतर गाड्यांमध्ये बसवून देवू लागले . आम्ही पण एका ४,५ जणाच्या कुटुंबाला आमच्या गाडीत जागा दिली . आणि लवकरच गंगटोक चे दिवे दिसू लागले . त्यांना त्यांच्या हॉटेलवर आम्ही पोचवले .रात्रीचे  २ वाजले होते . आम्ही पण हॉटेलवर पोचलो .आणि थोड्याच वेळात गादीवर पडलो .जे मला स्वप्नातही खरे वाटत नव्हते . माझ्या मारुती रायाने माझ्यावर खरच कृपा केली होती . कारण दुसऱ्या दिवशी कळले की आमच्या मागे ३०,४० गाडया  एक दरड कोसळली .त्यामुळे ते लोकं दुसऱ्या दिवशीपण अडकून पडले होते .पण त्यांना कॅम्प मध्ये हलवले होते.
अशा अनुभवांनी माणसाचा स्वतःवरचा आणि परमेश्वरावरचा विश्वास वाढतो . आणि मी जेव्हा जेव्हा त्या रात्रीचा विचार करते तेव्हा  मला या जीवनातल्या मोठ्या समस्या पण अतिशय छोट्या वाटू लागतात . आपल्याला मिळालेले हे जीवन खूप अनमोल आहे .फालतू गोष्टीनी खचून न जाता त्याचा उत्तम कारणाकरिता उपयोग करावा आणि हे नश्वर शरीर जोपर्यंत  आहे तोपर्यंत त्या परमेश्वरी शक्तीची आठवण ठेवून त्याला मनापासून दंडवत घालावा...............  
 

Wednesday, February 9, 2011

अखेरचा हा तुला दंडवत - भाग १

अखेरचा हा तुला दंडवत - भाग १
 
गंगटोक............ भारताच्या उत्तर ईशान्य भागातील एक लहानसे शहर  .दऱ्या, खोऱ्यानी वेढलेले , तिस्ता नदीच्या अवखळ प्रवाहाशी हितगुज करून तिला दूर करणारे गाव . कारण गाव बरेच उंचावर वसले आहे समुद्र सपाटीपासून  ६ ते ७००० फुट उंच . हे गाव बघायचे बरेच वर्ष  मनात होते .अखेर तो योग आलाच. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, चांगल्या आणि वाईट गोष्टीची सुद्धा  ........ 
मे महिन्यात थंड हवेचे ठिकाण गाठावे असा सुज्ञ विचार आम्ही केला आणि गंगटोक बघायला सिद्ध झालो .
गंगटोक तिथल्या उंच डोंगर दऱ्या करिता प्रसिद्ध आहे  ,निसर्गातील रौद्र  आणि सौम्य दोन्ही गोष्टींचा संगमच आहे.  गंगटोक पासून जवळच छांगू    लेक आणि नथुला पास ह्या दोन प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्या करता बरेच लोक जातात. चांगु लेक हे १२००० फुट उन्चीवर आढळणारे  एक सुंदर तळे आहे आणि भारत चीन बोर्डर जवळून पाहता येईल असा नथुला पास ह्या दोन गोष्टी  पाहण्या करता पूर्व परवानगी घ्यावी लागते. हे सर्व  सोपस्कार आटोपून आम्ही जाण्याचा दिवस निश्चित केला. स्नो पोइंत   पाहणे हे देखील एक आकर्षण होते. तेथे थंडी असेल म्हणून आम्ही प्रत्यकाने एक स्वेटर व शाली बरोबर घेतल्या. सकाळी आमचे परवाने बरोबर ९ वाजता आले आणि आम्ही महिंद्र TRAKS   या गाडीने निघालो .वातावरण खूपच छान वाटत होते स्वच्छ सूर्यप्रकाश पसरला  होता. मी माझे पती आणि माझा मुलगा .आणि आमचा ड्रायवर गाडीत  स्थानापन्न झालो. ड्रायवर म्हणाला आज तुम्ही लकी आहात.  छान ऊन पडले आहे आणि तुम्हाला परवाना पण लवकर मिळाला आहे काल जाणाऱ्या  लोकांना तर ११ वाजता मिळाला होता आणि काल थोडा पाऊस झाल्यामुळे त्या लोकांना बर्फाच्या पोइंत पर्यंत   जाता आले नाही. आज तुम्ही बर्फ , बाबामंदीर  छांगू  लेक सर्व काही पाहू शकाल.   या छांगू  लेकला जाण्यासाठी  केवळ जीप  हेच वाहन चालते .कारण अतिशय अरुंद आणि खडबडीत रस्ते.  आता महत्वाची गोष्ट म्हणजे या भागापासून चीनची बोर्डर अतिशय जवळ असल्याने या भागात मिल्ट्रीचे  जवान आणि  त्यांच्या छावण्या ठिकठिकाणी दिसत होत्या . मग मनामध्ये भारतीय जवानाचा जोश आणि धैर्य घेऊन त्या वळणदार वाटांमधून जीप पुढे जाऊ लागली .या रस्त्याने दोन  ते अडीच  तासात आपण छांगू लेकला पोचतो. पण येथील लोकं त्याचा उच्चार छोमगो लेक असा करतात  .तेथ पर्यंतचा  रस्ता असाच प्रत्येक वळणावर धडकी भरवणाराच   होता. हळू हळू वातावरणात बोचरी थंडी जाणवू लागली होती .काही वेळेला ती खूपच जाणवत होती .मधेच बऱ्याच ठिकाणी रस्ता  दुरुस्ती ची कामे सुरु होती .पहाडी  स्त्रिया, त्यांची २, ३  वर्षाची मुले  आणि माणसे या कामांमध्ये गर्क होते .एका बाजूला २ ते ३००० फुट खोल दऱ्या नि वर ढासळणारे खडक आणि दरडी  ,भुसभुशीत   माती मुळे झालेला चिखल ,आणि या कोणत्याच गोष्टीची विशेष तमा ना बाळगणारे जवान आणि हे कामगार .यांना बघून मनात इतक्या विचारांची दाटी झाली की बोलायची सोय नाही .रोज रात्री आपण जेव्हा  उबदार गादीवर   झोपतो. तेव्हा यांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागतो . जेव्हा गुरख्याच्या शिट्यानी  झोपमोड होते म्हणून आपल्याला वैताग येतो तेव्हा आपले हे सैनिक स्वतःच्या छातीवर शत्रूच्या गोळ्या झेलण्याकरिता  तयार असतात .ते तिथे जागे असतात म्हणून आपण घरी निवांत झोपू शकतो .आणि आपल्याला त्यांची आठवण होते जेव्हा त्यांच्या पैकी एखाद्या जवानाला मरणोत्तर वीर चक्र मिळते. पण असे सुद्धा किती असतात ज्यांच्या वाट्याला साधे फुलांचे चक्र सुद्धा येत नाही की त्यांची साधी आठवण सुद्धा येत नाही.अशाच एका जवानाचे स्मारक तिथे बनवले आहे .बाबा मंदिर .हरभजन सिंग नावाचा एक जवान ,जो सीमा रक्षणाच्या ड्युटी  वर होता. अशा जागी ,..जेथे गाडया ,वाहने काही जाऊ शकत नाही . अशा ठिकाणी काही जवान पायी जावूनच राहतात. अतिशय दुर्गम ठिकाणे असतात ही. अशाच एका जागी हा हरभजन सिंग होता .एके दिवशी एका धबधब्यात पाय घसरून पडला आणि मरण पावला .त्याचे हे वीर मरण झाले. त्याच्या मागे नंतर अनेक दंत कथाही जोडल्या गेल्या आहेत . त्याच्या नावे अजूनही भारत सरकार कडून त्याच्या कुटुंबियांना पेन्शन दिले जाते. ही घटना ३० ,४० वर्षापूर्वीची असली तरी. .. अशा घटना ऐकून उर अभिमानाने भरून आला .पण त्यालाही कुठेतरी कारुण्याची झाक होतीच....
अशा या बाबा हरभजन सिंगच्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही छोमगो लेक पाहीले .एवढ्या  उंचीवर एवडे मोठे तळे पाहताना आश्चर्य वाटते. अतिशय स्वच्छ किंचित हिरवट निळसर रंगाची झाक असलेले ते पाणी पाहून एकाच वेळी थोडी भीती पण  वाटली आणि त्या सुंदर वातावरणात   एक प्रकारची मंत्रमुग्धता आली माझ्यात ..... साधू संत अशा वातावरणात का साधना करतात हे पण थोडेसे उमजले . रंगीबेरंगी झुलीनी  सजवलेले  याक सुद्धा इथे दिसले .त्यावर बसवून लहान मुलांना काही जण चक्कर मारत होते .
  आणि  वाटेत काही ठिकाणी बर्फ सुद्धा दिसला.पण तो खूपच थोडा होता . बऱ्याच  वर्षांनी तो पाहिल्यामुळे , पुन्हा लहान मुलासारखे त्यात खेळून घेतले. थंडी वाजू नये म्हणून घातलेली  जीन्स  मी  बर्फावरून पाय घसरून आपटल्याने ओली  झाली आणि फारच गार वाटू लागले. म्हणून माझा ओसंडून जाणाऱ्या उत्साहाला  आवर घालत अहो म्हणले .आता बस ,किती वेळ बर्फात खेळती आहेस ,म्हणून जरा हिरमुसून मी पुन्हा गाडीत चढले.    हे सर्व पाही पर्यंत दुपारचा १ वाजला होता .वातावरण काहीसे ढगाळ वाटू लागले होते .पोटात कावळे कोकलत होते. म्हणून त्याच्या तोंडात  काही कोंबावे म्हणून म्हणून एक दोन उपहार गृहे दिसत होती . तिकडे वळलो. तिथे फक्त दोनच पदार्थ मिळत होते मोमो आणि maagi . मग त्या थंडीमध्ये मस्त पैकी नुडल्स गिळून आम्ही आमची जीप जिथे पार्क केली होती तिकडे जाऊ  लागलो . थोडा पाऊसही पडू लागला. आम्ही गाडीकडे धाव   घेतली .आणि काय आश्चर्य .........चक्क बारीक हिमकणांचा  हिमवर्षाव होऊ लागला . आणि गाडीपर्यंत पोचेपर्यंत त्या बारीक कणांचे   रुपांतर मोठ्या गारांमध्ये   झाले  .गाडीत बसेपर्यंत पती देवांच्या   डोक्यावर एक लिंबाएवढी गार पडली आणि कसेबसे आम्ही गाडी मध्ये घुसलो . एकीकडे जोरात पाऊस , गारपीट  आणि वळणावर काहीही ना दिसत अंदाजे गाडी चालवणारा ड्रायवर. मग मी त्याला म्हणले अहो तुमच्या  गाडीचे वायपर चालू करा की .एक तुच्छ कटाक्ष माझ्याकडे  टाकून तो म्हणला, "बिघडले आहेत.".मला सवय आहे अशीच. माझ्या छातीत धस्स झाले. 
मित्रहो आता पुढचा भाग उद्या सांगणार ,आमचे काय झाले पुढे तो भाग...... 

Friday, February 4, 2011

मला काय करायचे आहे ?


मला काय करायचे आहे ?
रोज सकाळी गजर लावून उठायचे .त्रासिक चेहऱ्याने गजर बंद करायचा. मग पुन्हा ५ मिनिटाने ,आता उठल्याशिवाय भागणार नाही म्हणुन वैतागत उठायचे .प्रातर्विधी आटोपून चहा करायचा .उभ्या उभ्याच प्यायचा .मग मुलांना  उठवायचे .त्यांचे डबे करता करता त्यांचे आवरायचे .डबे भरून मुलीला  शाळेत पाठवायचे .मग पतीराज आळस देत उठणार  .२,४ गोष्टी त्यांना ऐकू जातील अशा बेताने पुट पुटत, "घरात माझ्याशिवाय, कोणीही इकडची काडी  तिकडे करणार नाही", असे म्हणत पसारा आवरायचा. मग पुन्हा एकदा चहा ,नाश्ता सुरु. पति राज आटोपून ऑफिसला गेले की कपडे वॉशिंग मशीनला लावायचे. सासू बाई ,सासर्यांना चहा ,नाश्ता ........मग आपण नाश्ता खायचा .मग दुसऱ्या मुलाचा अभ्यास घ्यायचा .मग अंघोळ .मग २ मिनिटात पूजा .....पूजेतही ,नंतर काय काम करायचं याचा विचार.मग स्वयंपाक.  दुसऱ्या मुलाला  शाळेत पाठवायचे .मग कॉम्पुटर सुरु करून मेसेज पाहणे .मग फोन वरून वेळा  ठरवणे .लोकांच्या समस्या ,अभ्यास करून ठेवणे .त्यावर उपाय लिहून ठेवणे. फोन वर नवीन वेळा घेऊन टायमिंग फिक्स करणे.  मग घाईत जेवण करणे .मग थोडा वेळ फेसबुक. मग मुलगी ; शाळेतून येणार .मग तिचे जेवण . मग थोडा वेळ दोघींचा आराम .मग पुन्हा ४ नंतर आलेल्या लोकांशी बोलून त्यांचे समाधान करणे. एखाद्या व्यक्तीला जेव्हा त्याच्या समस्येचे उपाय सांगेन किंवा त्यांचे दडपण कमी करेन तेव्हा मनात एक आनंदाची लहर उमटते. .............मग पुन्हा संध्याकाळी मुलगा आला की त्याच नाश्ता .मग पुन्हा जेवण बनवणे .मग अहो येणार ...मग सर्वांची जेवणे ...मग मागचे सर्व आवरून एखादी T.V. वरची सीरिअल पाहे पर्यंत डोळे मिटायला लागतात .मग रिमोट नेच T.V. बंद करून आडवे व्हायचे. ...........पुन्हा सकाळी गजर ...........काय आहे हे ...........हे कोणते जगणे आहे... सतत रोज रोज ....तेच..........एक आहे; ......जगातल्या अनेक दुखी कष्टी लोकांपेक्षा आपले जगणे खूप चांगले आहे .पण..........मला अजून काहीच करायचे नाहीय का? असेच माझे आयुष्य जाईल की अजून काही करायचे आहे मला ........काही दिवसांपासून असा विचार सतत मनात येत होता.मग मी ठरवले एक दिवस दुपारी शांतपणे बसून मला माझ्या आयुष्यात काय करायचे आहे हे ठरवले. आता आपले आयुष्य  किती आहे आणि सर्व गोष्टी जमतील की नाही ही गोष्ट निराळी .पण विचार तरी करून पाहायला काय हरकत आहे.
 १) पहिली गोष्ट ; मला माझे शरीर सुदृढ बनवायचे आहे .निरोगी आणि उत्साही .......त्याकरिता मला रोज सकाळी फक्त अर्धा तास लवकर उठावे लागेल आणि थोडा व्यायाम आणि प्राणायाम करावा लागेल .
२) दुसरी गोष्ट मला माझ्या आयुष्यात नव नवीन देश आणि जागा पहायच्या आहेत .आणि त्यावर माझे अनुभव माझ्या वाचकांकरिता लिहायचे आहेत.  ज्यातून त्यांना आनंद मिळेल आणि मार्गदर्शनपण .  आता ही माझी अतिशय प्रामाणिक इच्छा आहे या करिता खूप उशीर करून चालणार नाही कारण शरीर थाकायाच्या  अगोदर म्हणजे किमान ५० ते ५५ वयाच्या च्या अगोदर  .......पण याकरिता भरपूर पैसे लागतील जे माझ्याकडे नाहीत. .पण मी काही भाग काटकसर करेल .आणि जे माझे मित्र मैत्रिणी परदेशात राहतात .त्यांच्यापैकी ज्यांच्याकडे मी आणि माझे पति ४, ५दिवस राहू शकू .अशा मित्र मैत्रिणीची मदत घेणे.
३)तिसरी गोष्ट जेवढे थोडे फार  अध्यात्मिक वाचन झालेले आहे आणि जेवढे माझ्या गुरुनी सांगितले आहे त्याप्रमाणे रोज किमान अर्धा तास ध्यान धारणा किंवा आत्म परीक्षण करून स्वतःची अध्यात्मिक उन्नती करून घेणे. माझी मुले मोठी झाल्यावर या करिता वेळ काढू .असा विचार पहिल्यांदा आला .पण अध्यात्म सांगते की उद्या कधी उगवत नाही .आजच आहे .म्हणुन जेव्हा जमेल तसे पण लगेच सुरु करणार.
४)माझ्या मुलांवर चांगले संस्कार घडवून त्यांना त्याच्या पायावर उभे करणार .या करिता मात्र  प्रत्येक क्षणी दक्षच राहावे लागेल .पण नंतर मात्र त्यांच्या संसारात लुडबुड करण्यापेक्षा अळवावरच्या पाण्याप्रमाणे संसारात असून नसल्यासारखे परमेश्वराच्या आराधनेत जीवन घालवणार. असे सध्या तरी डोक्यात आहे .........पाहू पुढे काय काय आहे ..........मला वाटते प्रत्येकाने अशी जर स्वतःच्या जीवनाची उद्दिष्टे लिहून काढली तर जीवन म्हणजे आला दिवस गेला दिवस असे ना राहता, ते  आपल्या उदीष्ट  पर्यंत  पोहोचण्याचा मार्ग बनेल आणि माणूस म्हणून जन्माला आल्याचे सार्थक होईल ."या सर्व गोष्टीत कटाक्षाने सातत्य ठेवणे महत्वाचे आहे ".वरील गोष्टी या माझ्या स्वतःच्या वैयक्तिक उद्दिष्टे आहेत पण याचा अर्थ असा नाही की ती आदर्श आहेत  किंवा तशीच असावीत .पण जी असतील  आणि त्याकरिता  आपल्याला काय काय करावे लागेल याचा जाणीवपूर्वक विचार करा आणि त्याप्रमाणे वागा .आणि ज्यांना माझा हा विचार आवडला त्यांनी मला नक्की सांगा.

Saturday, January 29, 2011

मुंगी उडाली आकाशी

मुंगी उडाली आकाशी
वेळ पहाटे  सव्वा तीन .मंद आवाजात गजर होतो .जरी मंद आवाजात असला तरी निद्रादेवीच्या कुशीत शिरलेल्यांना उठवण्याचे सामर्थ्य बाळगून असतो .पटकन अंगावरचे पांघरूण  सारून मी उठले .भर भर आवरून  चहा टाकला. चहाचे  दोन कप हातात घेऊन आले ,त्याच्या हातात एक ठेवला .आयत्या वेळेला आठवलेल्या एक दोन वस्तू ,पटकन पर्स मध्ये टाकल्या .अंघोळ उरकून bag बाहेर आणून ठेवली.
उबदार गादीत पहुडलेली माझी ११ महिन्यांची लेक . तिच्या शेजारी झोपलेला तिचा दादा ,आणि त्यांच्या शेजारी झोपलेली त्यांची आजी .छोटीचा पापा घेऊन ,त्यांच्यावरून मायेची नजर फिरवून मी निघाले .तो ही तयार होताच .दोघा चिमण्यांना आजी आजोबांकडे  सोपवून आम्ही निघालो . मुंबई  असली तरी पहाटे ४ वाजता जाणवणारा सुखद गंभीर गारवा अंगावर झेलत आम्ही विमानतळावर पोचलो .तेथे आवश्यक ते सोपस्कार उरकले .बाहेर अजूनही अंधार.... काही वेळातच विमानात बसण्याची वेळ झाली आपल्या सारख्या  कधीतरीच विमानात बसणार्यांना अजूनही विमान प्रवासाची  अपूर्वाई वाटतेच . आपण जरा कोणी स्पेशल आहोत असे वाटेपर्यंत विमानतळावरची गर्दी आपल्याला पुन्हा जमिनीवर आणून  सोडते . तरीही थोड्याशा जोशात विमानात पाऊल टाकले .खिडकीजवळची जागा मिळाली  होती . अजूनही प्रत्येकाच्या मनात असलेलं लहान मुल खिडकीजवळची जागा मिळताच आनंदत. मी पुढे जाऊन खिडकीशी बसले .तो सावकाश ऑफिसची bag सावरत माझ्या शेजारी बसला .मझा हा जरी काही पहिला विमान प्रवास नव्हता तरी खिडकीतून मान इकडे तिकडे वेळावून पाहीले .१०,१२ विमाने बाहेर उभी होती .अगदी आपल्या S.T. stand वरच्या बस सारखी. १० ,१५ मिनिटे झाली विमान उडण्याचे लक्षण दिसेना .प्रवासी येऊन बसत होते .कोणी काही वस्तू मागत होते .आता मात्र पहाटे कडून  चोरलेली झोप हळूच  डोळ्यात परतू लागली .जरा डोळे मिटताहेत तोवर डोळ्यापुढे विचार दृश्ये साकारू लागली .
माझ्या मिस्टरांची बदली झाली नागपूर येथे .आता नागपूर म्हणजे जबरदस्त उन्हाळा . अगदी लहानपणापासुन नागपूर म्हणजे तप्त  उन्हाळा हे चित्र डोळ्यासमोर असल्याने मी खूप वैतागले होते या बदलीकरिता .त्यातून मी पुणेकर ,बदलीमुळे २, ३ वर्षे मुंबईत काढलेली ,पण आता पुन्हा नागपूरच्या उन्हाळ्यात जायला  अगदी नाखूष होते .आता मुलांची शाळा बदलावी  लागेल. घर बदलावे लागेल . यांचे साहेब म्हणले आधी मुलांच्या अडमिशन  करा . म्हणून मग आम्ही चाललो होतो .आता तो म्हणत होता की तुला हिवाळ्यात नेतो तिथे म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन चांगले होईल .पण काही ना काही कारणाने ढकलले गेले आणि आम्ही आता निघालो होतो मार्च मध्ये .....
अचानक एक छोटासा  धक्का बसला  .विमान हळू हळू रनवे वर पुढे जाऊ लागले .तिथल्या  तिथेच २, ४ चकरा मारून मेन रनवे वर आले आणि आकाशात उडण्याकरिता सज्ज होण्याकरिता जशी छातीत  हवा भरून घ्यावी तसा जोरात आवाज करत जोरात पळू लागले ,......जोरात ,....जोरात ,......अजून जोरात .........क्षणार्धात माझ्या  डोळ्यापुढे माझे छोटे बाळ आले मुलगा आला .आता विमान जमिनीशी संपक सोडेल. कदाचित माझासुद्धा या जमिनीशी शेवटचा संपर्क असेल का? ती दोघ मला परत दिसतील ना  ? असे विचार डोक्यात काहूर माजवू लागले डोळ्यांमध्ये भरलेलं पाणी आत जिरवत बाहेर पहाते तोपर्यंत विमान आकाशात झेपावले .आतापर्यत रनवे वर होणारा चाकांचा आवाज क्षणार्धात  थांबला. मोठ्या इमारती लहान दिसू लागल्या शेजारच्या धारावी झोपड पट्टीची  छपरे क्षणार्धात  चपटी  दिसत नजरे आड झाली विमान अजून उंच उडाले आणि  शक्य तितकी मान वाकवत मी बाहेर पाहीले .आणि अचानक समुद्र दिसला .ही नदी आहे, तलाव की समुद्र ..........तो समुद्रच होता भारताच्या  नकाशावर डावीकडचा भाग निळ्या रंगाने भुषवणारा ,....अरबी समुद्र .विमानातून दिसणारी ती किनार पट्टी पाहताच मी आनंदाने म्हणाले ,अरे हे बघ इकडे समुद्र बघ . तो नुसताच हसला .त्याचा बऱ्याच वेळेला विमान प्रवास झाल्याने त्याला त्याचे अप्रूप नव्हते .मग मी एकदम गप्पच बसले . दहा ,पंधरा  मिनिटांनी खिडकी बाहेर बघता बघता पिंजलेल्या कापसाच्या अपरंपार राशी दिसू लागल्या उबदार पांढऱ्या  कापसाच्या उशाच जशा, असे वाटू लागले .आणि या पूर्ण अवकाशात  आपले काय स्थान आहे, असे वाटू लागले . माणूस क्षणाक्षणाला करतो   हेवेदावे माझे ,तुझे, मी आणि माझेच सर्व .पण या आसमंतात मी कोण आहे ? काय आहे हे परब्रह्म तत्व . माझे मन त्या अनंताचा विचार करू लागले. या संसाराचा  या जगाचा इतका  मोह सर्वाना का वाटतो ?या ढगात ,या आकाशात ,या परमेश्वराच्या  कुशीत किती आनंद आहे.जे कणाकणात  भरून राहिले आहे .ते हेच परब्रह्म तत्व आहे मी तिचाहे ,त्यातलीच आहे गरज आहे फक्त समजून घेण्याची या अनंतात विलीन होण्यास मी आता अगदी तयार आहे ,अशा विचारत मी काही काळ हरवून गेले . 
तेवढ्यात टी....... कॉफी .....अशा आवाजाने मी भानावर आले .थोडा चहा ,नाश्ता घेऊन मी पुन्हा विचारत गढले .कसे व्हायचे या नागपूरच्या उन्हाळ्यात ? माझी चिमणी लेकरं या उन्हाळ्यात सुकतील ना .का बर मला याव लागतंय इकडे ? असा विचार करेपर्यंत ७ वाजले .विमान थोडे खाली आले .पण जमिनीवर ऊन आहे असे वाटेना . त्याला म्हणाले तर तो म्हणाला ,आपण लवकर उठलोय म्हणून काही सूर्य  लवकर उगवून लवकर ऊन येणार आहे का? एवढ्या सकाळी ऊन पडत नसतं. मी आपला मानेनच होकार दिला .हळूच विमान जमिनीच्या दिशेने झेपावले . मुंबईच्या मानाने अगदीच कमी वस्ती वाटू लागली .  चाके जमिनीला टेकली विमानाचे दरवाजे उघडले .चला आता उन्हाची तलखी सहन करायला ,असेम्हनात मी दरवाज्यातून बाहेर पाऊल टाकले ........तर काय ???????????? हवा इतकी गार जसा पुण्यातला हिवाळा ........ आणि सगळीकडे पाऊस पडलेला ......अरे मार्च महिन्यात पाऊस कसा ? मी विचारमग्न झाले ...........थोड्या वेळापूर्वी इथल्या  उन्हाळ्याच्या कल्पनेने घाबरलेली मी ,,त्या परमेश्वराची अनुभती घेणारी मी आणि काही वेळात इथे झालेला गारवा .........काय आहे या विश्वात्म्याची ताकद ??????/जरी वाटला मनाचा  खेळ  ,तरी या मनातच असलेला एक कण नी त्या परमात्म्याचा अंश हे एकच आहेत .तर काय साधणार नाही त्याला .......फक्त हवा विश्वास त्याच्यावर, त्याच्यातल्या माझ्यावर आणि माझ्यातल्या त्याच्यावर