Thursday, February 10, 2011

दगडफूल

दगडफूल
सहजच जुन्या आठवणी आल्या . पण फार जुन्याही वाटेनात.  मी असेन तेव्हा साधारण  सातवीत किंवा आठवीत. तेव्हा पावसाळा होता. मी शाळेत नवीनच प्रवेश घेतला होता . पण तशा ४, ५ मैत्रिणी होत्या . शाळेत जायचे म्हणजे शाळेचे मैदान ओलांडून जावे लागायचे.  आणि ते मैदान म्हणजे शेतजमीनच होती . पावसाळ्यात असा चिखल व्हायचा म्हणता कि बोलायची सोय नाही. एक पाऊल टाकले कि ते अर्धा फुट आत जायचे आणि वर काढले कि चपलेला मोठा चिखलाचा गोळा चिकटून मगच चप्पल बाहेर यायची. शेवटी वर्गात पोचेपर्यंत चप्पल फुट फुट उंच झाल्या असायच्या. बरे तेव्हा बूट वगेरे भानगड नव्हती. मग दिवसभर पाऊस असाच वेड्यासारखा कोसळायचा. मग पाणी वर्गाच्या छतातून टपकायला लागायचे . कधी या बाकावर तर कधी त्या बाकावर .... मग प्रत्येकजण बाके सरकवून बसायचे .आणि गम्मत म्हणजे मग कधी कधी आमच्या बाई बाके जोडून बसायला सांगायच्या . आमची शाळा मुलामुलींची होती. आणि तेव्हा हल्लीसारखे मुले मुली बोलत नसत  . वरून पावसाचे पाणी टप टप गळत असे. दरवाज्यातून ,फुटलेल्या काचातून पावसाचे  पाणी आत येत असे.
असे कधी कधी खूप छान  वाटायचे . कोणाचेच लक्ष नसायचे कि बाई काय शिकवत आहेत. गारठ्याने कधी कधी दात वाजायला लागायचे . त्यातच काही मुलांचे नि मुलांचे एकमेकांकडे चोरून पाहणे सुरु असायचे .ते क्वचित माझ्याही लक्षात यायचे . मग आमच्या  मैत्रीणीना  गुप्त बातमी कि कोणाचे कोणाशी काय चालू आहे . पण हे सगळे अगदी निष्पाप पणे हं.  हल्लीच्या मुलांएवढे  जनरल नॉलेज आमचे नव्हते. असेच कसेतरी पहिले ५ तास संपायचे . मग २०, २५ मिनिटाची सुट्टी असे . सुट्टी झाली रे झाली कि आम्ही ४,  ५ मैत्रिणी मागच्या गेट मधून जाऊन एक  रस्ता  ओलांडून बाहेर पळायचो . त्या रस्त्या पलीकडे एक मोठे खडकाळ मैदान होते . पुढे एक जरा खोल असा भाग होता . त्यातून पावसाळ्यात ओढ्यासारखे पाणी वाहायचे .ते पाणी पहात राहणे हं आमचा आवडता छंद  होता . मध्ये बरेच उंच गवत उगवले होते. त्या खडकाळ आणि पावसाने  शेवाळे उगवून बुळबुळीत झालेल्या खडकांवर आम्ही बसायचो.  पाण्याकडे पाहायचो. त्या खोल पाण्यत आणि शेजारच्या उंच खडकांमध्ये जेमतेम एक फुटाची अशी चिंचोळी पट्टी होती. त्या चिंचोळ्या पट्टी वरून  कसाबसा पाय सावरत एका हाताने खडकाचा आधार घेत आम्ही दोघी तिघी पलीकडेपर्यंत जाऊन यायचो. तिथे काही खडकांवर दगड्फुले उगवली होती . खरे म्हणजे आमच्या दोघी तिघींचा; ती मसाल्यात वापरतो ती  दगड्फुले आहेत कि नाही यावर मतभेद होत असे. आता कॉलेजमध्ये मी जेव्हा वनस्पती शास्त्राची   पदवीधर झाले. तेव्हा कळले कि ती खरोखरच दगड्फुले होती. बऱ्याच वेळा आजही मसाला बनवण्याकरता दगड्फुले विकत  घेते तेव्हाही  मला ती शाळेमागच्या  धबधब्या जवळची आठवतात . आणि वाटते या क्षणी परत तिथे जावे   मैत्रिणीबरोबर  .पण आता इथे कोणीच नाही साऱ्या लग्न होऊन सासरी वेगवेगळ्या  गावांना गेल्या . मी पण संसारात अडकले . पण त्या आठवणी अजूनही मला हळुवार करतात.  संसाराच्या व्यापामुळे मला तिथे जाता येत नाही . आणि कदाचित या वयात त्या वाटेवर चालता येईल कि नाही हे पण सांगता येत नाही  . तेव्हा वाटत  माझ  मन पण झालय एक दगडफूल ;...............  खडकावरच आपलं  जीवन जगणारं ...........
सोनाली जोशी लिखितकर

No comments:

Post a Comment