Thursday, February 10, 2011

अखेरचा हा तुला दंडवत -भाग २

अखेरचा हा तुला दंडवत -भाग २
माझ्या मित्र मैत्रीणीनो तुम्ही दिलेल्या उत्तम प्रतिसादाने मला लगेचच पुढचा भाग लिहायला उद्युक्त केले आहे. मग पहा आता काय झाल पुढे ...............
छोम्गो लेकच्या अवघड घाट रस्त्यावर आम्ही गाडीसकट जात होतो .म्हणजेच आम्ही गाडीत होतो आणि आमची गाडी चालली होती. जोरदार पाऊस आणि त्याच्या जोडीला लिंबाच्या आकाराच्या कधीही न पाहिलेल्या गारांचा  एवढा मोठा वर्षाव यांच्या मुळे आम्ही एकाच वेळी थोडे घाबरलो आणि थोडे आनंदात होतो . पण ड्रायवर ज्या आत्मविश्वासाने काहीही न दिसणाऱ्या काचेतून जी गाडी चालवत होता ते बघून मी त्याच्यावर ओरडायला लागले.  अहो गाडी जरा वेळ साईडला घ्या . समोर दरी आहे की काय आहे. काहीही  दिसत नाहीय.
पाऊस आणि गारांचा असा न भूतो न भविष्यती मारा बघून आमचा थरकाप उडू लागला . त्या माऱ्या मध्येसुद्धा  त्याने   २० मिनिटे गाडी चालवली पण अचानक समोरच्या गाडीवाल्याने त्याची गाडी थांबवली . कारण त्याला त्याच्या गाडीला वायपर असूनही काही दिसेनासे झाले होते . पण बरे झाले; एकदाचा हा थांबला तरी,....... असे म्हणून आम्ही जरा विसावलो .घड्याळात सहज लक्ष गेले .दुपारचे २ वाजले होते. हॉटेलवर पोचायला जरा उशीर होणार .आणि मग संध्याकाळी ५ वाजता बंद होणारी  केबल कार राइड ची सफर आम्हाला करता येणार नाही की काय या विचारात मी चरफडू लागले. 
अशा जोराच्या गारपिटीने आमच्या पुढच्या सर्वच गाडया थांबल्या . असा जोरात गार-पाऊस दीड तास कोसळला .सर्व लोकं आपापल्या गाड्यात बसून पाऊस थांबण्याची वाट पहात होते .पाऊस थांबल्यावर सर्वाना हायसे झाले. गाडीच्या काचा उघडून आम्ही बाहेर पाहीले तर काय सगळीकडे पांढरे शुभ्र .....   समोरची गाडी आमच्यापासून ३०,४० फुटावर थांबली होती . बाहेर गारपीट झाल्याने वातावरण अतिशय गार झाले होते. पण बाहेरच्या दरी आणि डोंगरावर जी हिम कणाच्या  शालीची दुलई पसरली होती ती जरा बाहेर उतरून पहावी म्हणून मी गाडीचा दरवाजा उघडला . खाली पाय ठेवला तर काय ...........पाय घसरू लागला .चक्क पायाखाली बर्फाचा थर जमा झाला होता . मला तर हर्ष वायू व्हायचे बाकी राहिले होते. फार पूर्वीपासून अगदी शम्मी कपूरचे ,याहू सारखे सगळीकडे बर्फ असावे ,किंवा अमिताभच्या चित्रपटाप्रमाणे ये कश्मीर है ,ये कश्मिर है ............ असे गाणे आपणही कधीतरी बर्फामध्ये  म्हणावे अशी माझी अतृप्त   इच्छा होती तीच देवाने पूर्ण केली असे मला वाटले. माझ्या प्रमाणेच बऱ्याच जणांची  अवस्था झाली असावी .काही जणांनी गाडीतून उतरून VIDEO SHOOTING  सुरु केले आम्ही पण काही फोटो घेतले . येताना जे डोंगर  उघडे बोडके दिसत होते .त्यावर अगदी स्वित्झर्लंड    प्रमाणे  बर्फ पसरले होते . अतिशय हर्ष भरीत झालेले प्रवासी आणि त्यांचे रंगीबेरंगी स्वेटर , सर्वांचे प्रफुल्लीत चेहरे या मुळे वातावरण अतिशय रोमांचक झाले होते. माझ्या मनात आणि ओठावर सुद्धा अगदी एकामागून एक गाण्याच्या लाटा येत होत्या  .एक  था गुल और एक  थी बुलबुल  -शशी कपूर नंदाचे ;
तू मेरे सामने ,मै तेरे सामने ;शाहरुख आणि जुहीचे.......... काही विचारू नका ..........
.ड्रायवर अचानक उतरून कुठेतरी गायब झाला होता .  मी त्रासिक मुद्रेने अहोंना प्रश्न केला, कधी सुरु होणार  गाडी ? त्यानाही काहीच कल्पना येत नव्ह्ती . अचानक ड्रायवर उगवला .त्याला आम्ही प्रश्न विचारून बेजार केले .कधी जायचे आता ?थांबला की पाऊस ............ पण त्याचे एक नाही की दोन  नाही .मधून मधून बहिरा होता की काय कोण जाणे. .............. ये गाडी कब चलेगी ? मी निर्वाणीचे त्याला विचारले .तो म्हणाला "जब ये बरफ पिघलेगी. " मी विचारले ,कब पिघलेगी ? तो म्हणाला जब  सुरज  निकलेगा .......तब..........माझा आवाज बंदच झाला. अहो पण याच्यावरच गाडी चालवा की ........माझ्या या प्रश्नाचे प्रात्यक्षिका सह  उत्तर मला समोरच्या गाडीवाल्याने दिले .कारण त्याने गाडी सुरु केली पण एक  फुट सुद्धा ती जाऊ पुढे शकली नाही कारण ती एक फुट बर्फामध्ये रुतली होती .त्यांच्या ,आमच्या आणि सर्व लोकांच्या गाडया  अशाच बर्फामध्ये रुतून बसल्या होत्या . आता मात्र आमचे धाबे दणाणले . आता संध्याकाळचे ५ वाजले होते. हवा तर इतकी ढगाळ होती की ऊन पडणे शक्यच नव्हते .  आम्ही विचार करू लागलो इकडे जवळच मिलिटरी चे कॅम्प असतील. आपल्या मदतीला  नक्की कुणीतरी  येईल . बहुतेक गाड्यांचे ड्रायवर बाहेर पडून काय करता  येईल याचा विचार करत असावेत. आमच्या मागे ३, ४ गाडया दिसत होत्या आणि पुढे १ गाडी. कारण त्यानंतर वळण होते . आणि पुढे जाणे शक्य नव्हते  कारण बर्फावर चालता येत नव्हते. पाय घसरत होते. एकही मिलिटरीचा   जवान दिसत नव्हता. आम्ही गंगटोक पासून ३२ किलोमीटर लांब होतो .जिथे सर्व काही व्यवस्थित असतानाही गाडया २० ते ३० किलोमीटर पेक्षा जोरात जाऊ शकत नाहीत .तिथे आम्ही अशा ठिकाणी अडकलो होतो. 
'काळे कुट्ट आभाळ .........,आम्ही जवळपास  १०,००० हजार फुट  उंचीवर .........,समोर दऱ्यांमध्ये कोसळणारे भीषण धबधबे ,..........तर उजवीकडे केव्हाही दरड कोसळेल अशी भीती.........कारण पावसामुळे सर्व ओले झालेले .कोणाच्याही मोबाइलला रेंज नाही. कोणीही मदतीला येत नाहीय. आणि आणि आम्ही इकडे अडकून पडलो आहे . हे जगात फक्त आम्हालाच माहित आहे.............'आमचे आई वडील ...........काय माहित त्यांना ..............
  हे सर्व वातावरण केवळ आणि केवळ प्रलय काळाची   आठवण करून देणारे होते. डोके बधीर झाले होते .कुणावर चिडावे हेच कळत नव्हते . हवा अतिशय गार म्हणजे आपण फ्रीज मध्ये बसून राहिलो आहे  अशी. अंगात स्वेटर घटला आहे की नाही इतकी थंडी .वरून घेतलेली शाल कशीबशी थंडीशी सामना  करत होती. संध्याकाळचे ६ वाजले . अंधार पडला आता मात्र माझा धीर सुटला .आपण या ठिकाणाहून उद्या पर्यंत निघू शकणार की नाही असे वाटू लागले .आता मात्र मी देवाचा धावा करायला सुरवात केली .माझ्या कृष्णा  ,आम्हाला सोडव. मारुतीराया आम्हाला एका क्षणात गंगटोक  पर्यंत नेऊन पोचव .आमची गाडी सुखरूप पोचू दे. तो दिवस  शनिवार होता .म्हणून त्या पवन सुताची खूपच  आठवण येऊ लागली.  
डोळ्यातून अश्रू झर झरा वाहू लागले . शेवटी मनास शांत करावे म्हणून गळ्यात असलेली तुळशीची माळ काढून मी जप  करू लागले. तेवढाच मनाला आधार .................मग जवळपास अर्ध्या एक तासाने माझे चित्त थाऱ्यावर आले. मग आम्ही चक्क गप्पा मारू लागलो मी माझ्या मुलाशी आणि माझे पती  राजेश यांच्याशी पूर्वी वाचलेल्या एका धार्मिक पुस्तकावर गप्पा मारू लागलो .नेहमीच्या धकाधकीत एकमेकांशी बोलण्या एवढा वेळ असतो कुठे .पण आम्ही तिघेही एकमेकांचे सर्व काही मनापासून ऐकू लागलो . 
काही ड्रायवर लोकांकडे फावडी होती त्यांनी त्याचा एका जीप पासून दुसऱ्या जीपच्या चाकापर्यंत उकरून रस्ता बनवला ,म्हणजे फक्त चाकांपुरता. मग गाडी थोडीशी  हलली आणि २,३ फुट पुढे गेली .सगळ्यांच्या अंगात एक उत्साहाची  लहर पसरली .तेवढ्यात एक बातमी आली की समोरच्या वळणावर एक मिलिटरी ची बस उलटी झाल्यामुळे   वाहतूक थांबली आहे ती एका प्रोक्लोन च्या मदतीने सुलटी करण्यात यश आले होते .एक मिलिटरी ची   गाडी आली होती .  आता लवकरच आपली सुटका होणार असे सर्वाना वाटू लागले . ८ वाजले होते. पण थोडासा चंद्राचा प्रकाश पसरला होता . आता एक मिलिटरीची चाकांना साखळ्या असलेली गाडी येणार आणि ती  गाडया  जाण्या पुरता trak  बनवणार. अशी माहिती कळली . याच मार्गावर जवळपास १५० ते २०० गाडया  अडकल्या असाव्यात . आम्ही तरी लवकर निघालो होतो काही गाडया तर बाबामंदीर किंवा मधेच अडकल्या होत्या . आमच्या पुढच्या गाडीत कोण आहे हे आम्ही जरा  बाहेर पडून विचारले .गाडीत एक तान्हे ६ महिन्याचे बालकही आणि अजून  ६ जण  होते . आमच्या कडे २ बाटल्या पाणी होते ते ड्रायव्हर ला मधून मधून दिल्याने संपले होते . एक बिस्किटाचा पुडा होता .मग आम्हाला लक्षात आले .आम्ही १ वाजता नुडल्स खाल्यानंतर एक थेंब भर   पाणी किंवा एक कण सुद्धा खाल्ले नव्हते   आणि आम्हाला इच्छा सुद्धा होत   नव्हती . .मिलिटरी च्या गदिने थोडा मार्ग बनवला होता आणि आता गाडया थोड्या फार पुढे जाऊ शकणार होत्या .
आता आमच्या गाडीपासून पुढच्या आणि त्यापासून पुढच्या अशा गाडीपर्यंत फावाड्यानी एक चाकांपुरता  मार्ग बनवला आणि त्यावरून चक्क गाडी पुढे गेली ..........१०,१५ फुट .आम्ही आनंदाने ओरडू लागलो . पण आता मात्र पुढे काय आहे हे माहित नव्हते. आता पुढची बस साईडला काढल्या वर एक मोठा चढ होता .त्यावरून आमच्या पुढची गाडी गेली . नंतर लगेचच एक वळण होते .आता आमची पाळी  होती .पण काय कुणास ठाऊक आमची गाडी त्या चढा पर्यंत गेल्यावर बर्फावरून घसरू लागली .गाडीचे ब्रेक बहुतेक नीट नसावेत.    मग पुन्हा प्रयत्न केला ,मग पुन्हा एकदा .असा ५ वेळा प्रयत्न केला .  आम्ही हताश झालो .अचानक एक मिलिटरीचा जवान आला आणि म्हणाला गाडी पहिल्या गेयर मध्ये टाका .आणि काहीतरी झाले पण गाडी  २,४ क्षणात  तो चढ पार करून पुढच्या वळणावर आलीसुद्धा . त्या मारुती रायाचे  आभार हजार वेळा मानले .आता तिथून अंदाजे अर्धा एक किलोमीटर गाडी जाऊ शकली .
आता पुन्हा एकदा गाडया थांबल्या  .का काही कळेना कारण तसेच तर अंधारात काही दिसत नव्हते . पण जरा नीट पाहिल्यावर दिसले पुढे उतरणीचा रस्ता होता  .आणि तो सुद्धा अंदाजे ६० अंश तिरका तरी असावाच किंवा त्याहूनही जास्त .दुसऱ्या बाजूला अतिशय खोल दरी की पडले तर हाड सुद्धा मिळणार नाही .मिलीटरी चे जवान आले होते .पण ते तरी काय करणार ........ आमच्या पुढे ८, ते १० व्या नंबरवर असलेल्या गाडीने जायचा  प्रयत्न केला. अतिशय घाबरत  त्याचा चालक जाऊ लागला आणि नेमकी उतारावर त्याची गाडी बंद पडली . दुसऱ्या एकाने जायचं प्रयत्न केला .दुसऱ्या बाजूला असलेल्या दरीला घाबरत त्याने गाडी खूप साईडला घेतली तर ती गाडी डोंगरच्या बाजूने जी नळी तयार झाली होती त्या नळीत घसरली . त्यातील लोकांना बाहेर यावे लागले . बाहेर शून्य अन्शापेक्षाही कमी तापमान होते. पण या गाडीची अवस्था आघून बहुतेक ड्रायव्हर घाबरले . एक तर गाडया बर्फावर सटकत   होत्या .कडेला संरक्षित कठडा वगैरे काहीच नाही .आणि पडले तर समाधीच.   समोरच्या गाडीने जायचा प्रयत्न केला.पण घाबरून त्या ड्रायवर ने रडायलाच सुरवात केली कारण तो सिलीगुडी हून  आला  होता त्याला एवढ्या अवघड घाटची सवय नव्ह्ती. मग सर्व लोकांनी ठरवले की आता आहे त्याच परिस्थितीत सर्वांनी सकाळ होईपर्यंत बसून राहायचे .सूर्य उगवून बर्फ  वितळेल तेव्हा जायचे .पण ते सुद्धा अवघडच होते . कदाचित या थंडीनेच मारून जाऊ असे वाटू लागले . माझ्या मुलाचे हात पाय अतिशय गार पडले होते . स्वेटर आणि शालीचा काहीच उपयोग होत नव्हता . माझ्या लहान मुलीला आम्ही या ट्रीपला आणले नव्हते .या गोष्टीकरिता मी देवाचे आभार मानले .
ratriche १०  वाजले होते .  आम्ही गारठून गेलो होतो, केवळ एकमेकांना बिलगून बसणे या पलीकडे काहीही करू शकत नव्हतो .पुन्हा कधीही अशा उंचावरची ठिकाणे पाह्यची नाहीत असे हजारवेळा ठरवून झाले. तेवढ्यात एक बातमी आली .की एक मिलिटरी ची  बस  आली आहे .पण ती तो उतार पार करून पुढे १ किलोमीटर अंतरावर थांबली आहे त्या गाडीने लोकांना जाता येईल .त्यामुळे ज्या लोकांच्या गाडया बंद पडल्या आहेत किंवा ज्या गाड्यांचे चालक गाडी चालवू  शकत नाहीत त्यांनी तिथ पर्यंत चालत जावे. मग खुपसे लोकं पायी उतरून ,हातात सामान घेवून चालू लागले .म्हातारे ,लहान मुले ,सर्वच ......... 
पण आम्ही विचार केला जर का त्या बस मध्ये एवढे लोकं मावले नाहीत किंवा अजून काही समस्या निर्माण झाली तर .......त्या पेक्षा आपण आहे या स्थितीतच बसून राहावे. असा २  तास गेले रात्रीचे १२ वाजले  .लोकं जातच  होते. कोणी पडत होते .कोणी उठत होते .फार अवघड परिस्थिती होती. आमचा ड्रायव्हर जो मधेच गायब झाला होता तो धुमकेतू सारखा उगवला .त्याच्या बरोबर एक थोडासा पिलेला माणूस पण होता . पण तरीही पूर्ण शुद्धीत आणि नीट बोलत होता . तो आमच्या ड्रायवरला  म्हणाला ,हा उतार जर तुम्ही पार  केलात तर पुढे काही अवघड नाही पुढचा रस्ता फारसा धोकादायक नाही .असे त्या दोघांचे बोलणे चालले होते. आणि अचानक ड्रायवर म्हणला मी या उतारावरून जाणार  आहे . तुम्हाला पाहिजे तर या नाहीतर मी चाललो . मी नेइन नीट गाडी .  पण आम्ही म्हणले नाहीतर हा पूर्ण उतार आम्ही पायी चालत येतो मग तुम्ही गाडी अन त्यावरून .....कारण तो तिथे थांबायला अजिबात तयार  नव्हता . म्हणाला तुम्ही गाडीत बस जर कुठे प्रोब्लेम वाटला तर मीच तुम्हाला उतरायला सांगेन. पण तो उतार ती महाकाय दरी आणि बर्फावरून घसरणारे टायर. आणि ना ऐकणारा ड्रायवर . मला वाटू  लागले ,आता काही आपले खरे नाही .कदाचित माझ्या निसर्गावरच्या प्रेमामुळे परमेश्वराने माझ्या चिर  विश्रांतीचे हेच ठिकाण निश्चित  केले असावे . माझ्या नंतर माझ्या ५ वर्षाच्या मुलीचे काय होईल .तिला कोण पाहील..... देवा .........आता तूच तिचा सांभाळ करायचा आहेस . आम्ही तिघेही जण एकमेकांच्या कुशीत शिरलो .आता हीच आपली अंतिम भेट ..........कृष्णा तू तरी आहेस ना..........अखेरचा हा तुला  दंडवत
गाडी उताराच्या दिशेने पुढे पुढे जाऊ लागली.  मी डोळे घट्ट मिटले एक हात त्यांच्या हातात आणि एका हाताने मुलास घट्ट धरले. मनामध्ये मारुतीरायाचा धावा सुरु केला हनुमंता ,पवन सुता मी कधी जरी थोडे तरी तुझ्यावर मनापसून  भक्ती  केली असेल तर आम्हाला  सुखरूप या गाडी सकट  गंगटोक ला पोचव . भीम रुपी महारुद्र वज्र हनुमान मारुती ,..........असा जो धावा सुरु केला की काय सांगू अगदी ती २,३ मिनिटे मला काही सुद्धा कळले नाही .आणि ...........
अग आई , अग आई ,डोळे उघड ना आपण त्या उतारावरून खाली  आलो पण ...........माझा मुलगा मला हलवत होता .........माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता . डोळ्यातून घळ घळ अश्रूंच्या धारा सुरु झाल्या .............मी खरच जिवंत होते .आम्ही सर्वजण नीट होतो .आम्ही सर्वांनी ड्रायवर सकट आनंदाचा जल्लोष केला .आणि आमच्या तयार झालेल्या टायर च्या खुणावरून मागची गाडी पण येण्याच्या प्रयत्न करू लागली . आता पुढचा रस्ता फारसा अवघड  नव्हता ..मागच्या गाडया पण हळू हळू येऊ लागल्या . वाटेत बरेच लोकं थांबले होते .त्यांना मिलिटरी च्या गाडीत जागा मिळाली  नव्हती .आपले जवान अशा लोकांना इतर गाड्यांमध्ये बसवून देवू लागले . आम्ही पण एका ४,५ जणाच्या कुटुंबाला आमच्या गाडीत जागा दिली . आणि लवकरच गंगटोक चे दिवे दिसू लागले . त्यांना त्यांच्या हॉटेलवर आम्ही पोचवले .रात्रीचे  २ वाजले होते . आम्ही पण हॉटेलवर पोचलो .आणि थोड्याच वेळात गादीवर पडलो .जे मला स्वप्नातही खरे वाटत नव्हते . माझ्या मारुती रायाने माझ्यावर खरच कृपा केली होती . कारण दुसऱ्या दिवशी कळले की आमच्या मागे ३०,४० गाडया  एक दरड कोसळली .त्यामुळे ते लोकं दुसऱ्या दिवशीपण अडकून पडले होते .पण त्यांना कॅम्प मध्ये हलवले होते.
अशा अनुभवांनी माणसाचा स्वतःवरचा आणि परमेश्वरावरचा विश्वास वाढतो . आणि मी जेव्हा जेव्हा त्या रात्रीचा विचार करते तेव्हा  मला या जीवनातल्या मोठ्या समस्या पण अतिशय छोट्या वाटू लागतात . आपल्याला मिळालेले हे जीवन खूप अनमोल आहे .फालतू गोष्टीनी खचून न जाता त्याचा उत्तम कारणाकरिता उपयोग करावा आणि हे नश्वर शरीर जोपर्यंत  आहे तोपर्यंत त्या परमेश्वरी शक्तीची आठवण ठेवून त्याला मनापासून दंडवत घालावा...............  
 

No comments:

Post a Comment