कोणाला कुठे पाहावे ?
काय आहे पण एक गम्मत आहे . परवा मी अशीच चालले होते रस्त्याने .मग एका दुकानात गेले .आणि तिथे अचानक मला एक बाई दिसल्या .मला ओळखलेत का ? असे विचारू लागल्या .आता हा असा प्रश्न विचारणाऱ्या लोकांची तर मला बाई धास्तीच असते .कारण एक तर बऱ्याच वेळा मला ही व्यक्ती कोण हे अजिबात आठवत नाही किंवा नुसता चेहरा आठवतो पण नाव किंवा यांना कुठे पाहीले आहे हे अजिबात आठवत नाही. मग त्या मात्र अशा जोशात बोलू लागल्या की मी त्यांना ओळखले नाही किंवा मला त्यांचे नाव आठवत नाही हा मोठा गुन्हा झालाय ......शेवटी मी त्यांच्यासमोर शरणागती पत्करली आणि म्हणले ,नाही हो काकू मला पहिल्या सारखा वाटतंय पण बाकी आठवत नाही . मग म्हणाल्या ,अहो तुम्ही नाही का मागे लायब्ररी मध्ये यायचात सिंहगड रोडला . तिकडे पाहील होत बऱ्याच वेळा तुम्हाला .असे त्यांनी सांगितल्यावर मी सुटकेचा नि:श्वास टाकला. कदाचित त्यांना लायब्ररीत पाहीले असते तर सहज ओळखले असते .पण देवळात.....आठवले नाही .
खर म्हणे माणसाला एखाद्या व्यक्तीस एका विशिष्ट ठिकाणी पहायची सवय झाली ना की दुसरीकडे त्या व्यक्तीला पाहूनही लक्षात येत नाही की हा माणूस कोण ? मध्ये एकदा बसने जाताना समोरच्या बाकावरील माणूस मला ओळखीचा वाटू लागला . काही केल्या आठवेना .बर तो माणूस पण काही ओळख दाखवेना . मग मी कशी विचारणार ? आता एखादी गोष्ट माझ्या डोक्यात घुसली की मी तिचं छडा लागेपर्यंत वेडी पिशी होते . मग दिवसभर मला सारखे तेच आठवत होते .शेवटी एकदम अचानक लक्षात आले की हा माणूस म्हणजे आमच्या घराजवळच्या किराणा दुकानात असणारा विक्रेता .
आता अजून एक प्रश्न म्हणजे माझ्याकडे येणारे जातक .स्वतःच्या समस्या आणि त्यांचे समाधान यावर माझ्याशी तास तास बोलणारे , पण बऱ्याच कुंडल्या आणि बरेच वर्ष या व्यवसायात असल्याने मी मात्र काही जणांना विसरून जाते .पण त्या लोकांना मात्र त्यांना संकटातून सुटण्याचा मार्ग दाखवल्याने किंवा त्यांचे दडपण काही प्रमाणात का होईना माझ्याडून कमी झाल्याने त्यांच्या मात्र मी एकदम लक्षात असते .मग कधी अचानक लक्ष्मी रोडवर madam ओळखलत का? मी नाही का आलो होतो बघा ,माझ्या बहिणीच्या लग्न संदर्भात ,किंवा तुम्ही नाही का मला माझ त्या मुलीबरोबर लग्न होईल की नाही हे सांगितलं... किंवा अहो madam ,अजूनही पाहता का तुम्ही भविष्य ....असे अचानक एक बॉम्ब टाकणारे पण भेटतात ....
तुम्हाला कुणाला असा अनुभव आलाय का की जी व्यक्ती ज्या ठिकाणी आहे तिथेच ओळखू येते ....मग सांगा की मला
सोनाली लिखितकर
No comments:
Post a Comment