मानस पूजा
आपल्या अध्यात्मिक ग्रंथांमध्ये मानस पुजेस फार मोठे स्थान दिले आहे .बऱ्याच वेळा काही लोकं पूजा करत असतात पण मन मात्र दुसरीकडे असते .सासूबाई पूजा करता करता आपल्या सुनेस सूचना करत असतात तर सून पूजा करताना मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देत असते .पण केवळ हळदी कुंकू फुले आणि उदबती या पेक्षा काहीही नसताना केलेली मानसपूजा फार महत्वाची ठरते .पण ती कशी करायची याची माहिती व्हावी म्हणुन हा प्रपंच .अर्थात प्रत्येकाची पूजा करण्याची वेगळी पद्धत असू शकते
परवा असंच दुपारी बसले होते .आणि अचानक डोळ्यापुढे मागच्या वर्षी गेलेल्या गंगटोक च्या जंगलातील आठवणी आल्या .अतिशय सुंदर हिरवेगार पसरलेले जंगल आणि त्यातून झुळ झुळ आवाज करत वाहणारा ओढा, त्या ओढ्याच्या काठा काठाने मी जातीय .शेजारीच मंद सुगंध येणारे एक पांढऱ्या शुभ्र फुलांचे झाड आहे. कसले झाड आहे कुणास ठाऊक ? त्याच्या जवळ गेले आणि ते झाड थोडेसे हलवले तर अगदी माझ्या अंगावर त्याच्या कोमल पाकळ्यांचा वर्षाव झाला .माझी पावले बुडतील इतक्या पाकळ्यांचा खच पडला .मी अलगद त्यातून एक ओंजळ भरून घेतली आणि त्यांचा सुगंध घ्यावा अशी इच्छा झाली पण त्याच बरोबर माझ्या परम प्रिय प्राण सख्याची मला आठवण आली. कुठे आहे माझा जिवलग ,? माझा सख्या हरी , माझा कृष्ण ...? बरेच दिवसात दिसला नाही . अगदी त्याच क्षणी एक पांढऱ्या वस्त्रातला एक छोटा मुलगा मला दिसला .अरे बाळा ,माझा कृष्ण कुठे पाहिलास का रे?
अग, त्या छोट्याशा वाटेने पुढे गेलीस ना की लगेचच त्या झाडांच्या जवळ आहे तो.
बर बाळा, पहाते हा ...असे म्हणुन मी पुढे निघाले .छोट्याशा वाटेने पुढे गेले झाडांच्या मागे पाहीले पण तो दिसला नाही .पुढे पाहीले मागे पाहीले ,गोल फिरून पाहीले . मग अजून जरा पुढे जाऊन पाहीले .कुठेच दिसेना माझा राजा !!मी त्याच्या करता तडफडू लागले .कुठे आहेस रे ?किती वाट पहायची तुझी .?तरीही तो दिसला नाही .मग मात्र डोळ्यात पाणी भरून आले हातातील फुलांच्या ओंजळीवर डोळ्यातील थेंब पडले .त्याच क्षणी त्याच्या बासरीचा; मनाचा ठाव घेणारा आर्त ,पण सुमधुर ध्वनी कानावर पडला .आणि तिथेच एका लाकडाच्या ओंडक्यावर तो दिसला, किती सुंदर !!!!!!!किती प्रेमळ !!!!!!!किती आणि कसा ....शब्दच संपले माझे .त्याच्या कृपाळू नेत्रांकडे पाहीले मी .
"कुठे होतास रे राजा इतके दिवस आणि केव्हाची शोधतीय मी तुला ?
"अग तुच किती दिवस झाले मला विसरलीस, चक्क २ दिवस झाले गं .....मी तरी केव्हाची वाट पहात बसलोय तुझी इथे . काल तर झोपलो सुद्धा नाही .
पण मगाशी तर इथे दिसला नाहीस ?
अग तुला माहितीय ना तुला, अतिशय आर्त पणे माझी आठवण येईल तेव्हाच मी भेटेन म्हणुन ....
हो ना कृष्णा, मी उत्तरले .,ही बघ फुले ,किती गोड आहेत ना .
तू माझ्या करता आणलीस ना मग ती खूपच गोड आणि सुंदर असणारच .
कृष्णा ,जरा थांब इथे बस बर ....तुझे पाय पाहू . अरे , ...हे काय रे पितांबराला इतकी धूळ कशी ?
अग काय सांगू ,आज २, ४ भक्त मोठ्या संकटात सापडले होते मग खूप धावाधाव केली .
अरे राम !मग आता कसे आहेत भक्त गण .?
आता ठीक आहेत गं.
थांब जरा आधी मी जरा तुझ्या चरण कमलांचे दर्शन घेते रे .मग अतिशय हळुवार पणे ,त्याची पावले पाहीली धावून धावून आणि उन्हातान्हात अगदी लाल झाली होती .मी म्हणाले थांब इथेच .आणि पटदिशी धावले नदीपाशी . माझ्या ओंजळीत गार पाणी घ्यावे म्हणुन विचार केला तर काय ओंजळीत मगाचीच फुले राहिली होती .मग ती फुले तिथेच ठेवून दिली आणि हातात थंड पाण्याची ओंजळ घेऊन पळतच त्याच्या कडे गेले .त्या थंड पाण्याने हळुवार चोळून त्याचे सुकोमल चरण धुतले .माझा कमल नयन ,माझ्या कडे आनंदाने पहात होता .अरे थांब ना फुले तिकडेच राहिली .
अग थांब ग ,पहा ....इथे.... त्याने पायाकडे बोट केले . मी नजर टाकली तर काय मी आणलेलीच फुले त्याच्या पायावर .अग तू मनात जेव्हा भावना आणलीस तेव्हाच ती मला पोचली .माझे नेत्र पुन्हा भरून आले .अग राणी किती रडशील सारखी ? तुझे असं हे अपार प्रेमच मला तुझ्याकडे सारखं खेचून आणत बघ .त्याने माझे हात हातात घेतले आणि मला जवळ बसवले .मी त्याच्या कडे आणि कृष्ण सखा माझ्या कडे ,इतके अपरंपार पाहीले की त्याचे आणि माझे मन अगदी एक होऊन गेले .एक मन , एक विचार, एक शरीर ,....एक आणि एक.... तो आणि मी वेगळे नव्हेच अगदी एक .पुन्हा बासरीचे कर्णमधुर स्वर कानी पडू लागले .त्या स्वरात मी त्याच्याशी पूर्ण एकरूप झाले .जंगल ,पाण्याचा ओढा ,ते शुभ्र फुलांचे झाड ,आणि मी सर्व काही तोच ,माझा श्रीकृष्णमय झाले ......
पूजा म्हणजे अजून वेगळे काय असते ? हीच ती मानस पूजा ...............ज्यांना आवडली त्यांनी जरूर करून पहा आणि मला अनुभव सांगायला विसरू नका.
सोनाली जोशी लिखितकर
No comments:
Post a Comment