Wednesday, February 9, 2011

अखेरचा हा तुला दंडवत - भाग १

अखेरचा हा तुला दंडवत - भाग १
 
गंगटोक............ भारताच्या उत्तर ईशान्य भागातील एक लहानसे शहर  .दऱ्या, खोऱ्यानी वेढलेले , तिस्ता नदीच्या अवखळ प्रवाहाशी हितगुज करून तिला दूर करणारे गाव . कारण गाव बरेच उंचावर वसले आहे समुद्र सपाटीपासून  ६ ते ७००० फुट उंच . हे गाव बघायचे बरेच वर्ष  मनात होते .अखेर तो योग आलाच. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, चांगल्या आणि वाईट गोष्टीची सुद्धा  ........ 
मे महिन्यात थंड हवेचे ठिकाण गाठावे असा सुज्ञ विचार आम्ही केला आणि गंगटोक बघायला सिद्ध झालो .
गंगटोक तिथल्या उंच डोंगर दऱ्या करिता प्रसिद्ध आहे  ,निसर्गातील रौद्र  आणि सौम्य दोन्ही गोष्टींचा संगमच आहे.  गंगटोक पासून जवळच छांगू    लेक आणि नथुला पास ह्या दोन प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्या करता बरेच लोक जातात. चांगु लेक हे १२००० फुट उन्चीवर आढळणारे  एक सुंदर तळे आहे आणि भारत चीन बोर्डर जवळून पाहता येईल असा नथुला पास ह्या दोन गोष्टी  पाहण्या करता पूर्व परवानगी घ्यावी लागते. हे सर्व  सोपस्कार आटोपून आम्ही जाण्याचा दिवस निश्चित केला. स्नो पोइंत   पाहणे हे देखील एक आकर्षण होते. तेथे थंडी असेल म्हणून आम्ही प्रत्यकाने एक स्वेटर व शाली बरोबर घेतल्या. सकाळी आमचे परवाने बरोबर ९ वाजता आले आणि आम्ही महिंद्र TRAKS   या गाडीने निघालो .वातावरण खूपच छान वाटत होते स्वच्छ सूर्यप्रकाश पसरला  होता. मी माझे पती आणि माझा मुलगा .आणि आमचा ड्रायवर गाडीत  स्थानापन्न झालो. ड्रायवर म्हणाला आज तुम्ही लकी आहात.  छान ऊन पडले आहे आणि तुम्हाला परवाना पण लवकर मिळाला आहे काल जाणाऱ्या  लोकांना तर ११ वाजता मिळाला होता आणि काल थोडा पाऊस झाल्यामुळे त्या लोकांना बर्फाच्या पोइंत पर्यंत   जाता आले नाही. आज तुम्ही बर्फ , बाबामंदीर  छांगू  लेक सर्व काही पाहू शकाल.   या छांगू  लेकला जाण्यासाठी  केवळ जीप  हेच वाहन चालते .कारण अतिशय अरुंद आणि खडबडीत रस्ते.  आता महत्वाची गोष्ट म्हणजे या भागापासून चीनची बोर्डर अतिशय जवळ असल्याने या भागात मिल्ट्रीचे  जवान आणि  त्यांच्या छावण्या ठिकठिकाणी दिसत होत्या . मग मनामध्ये भारतीय जवानाचा जोश आणि धैर्य घेऊन त्या वळणदार वाटांमधून जीप पुढे जाऊ लागली .या रस्त्याने दोन  ते अडीच  तासात आपण छांगू लेकला पोचतो. पण येथील लोकं त्याचा उच्चार छोमगो लेक असा करतात  .तेथ पर्यंतचा  रस्ता असाच प्रत्येक वळणावर धडकी भरवणाराच   होता. हळू हळू वातावरणात बोचरी थंडी जाणवू लागली होती .काही वेळेला ती खूपच जाणवत होती .मधेच बऱ्याच ठिकाणी रस्ता  दुरुस्ती ची कामे सुरु होती .पहाडी  स्त्रिया, त्यांची २, ३  वर्षाची मुले  आणि माणसे या कामांमध्ये गर्क होते .एका बाजूला २ ते ३००० फुट खोल दऱ्या नि वर ढासळणारे खडक आणि दरडी  ,भुसभुशीत   माती मुळे झालेला चिखल ,आणि या कोणत्याच गोष्टीची विशेष तमा ना बाळगणारे जवान आणि हे कामगार .यांना बघून मनात इतक्या विचारांची दाटी झाली की बोलायची सोय नाही .रोज रात्री आपण जेव्हा  उबदार गादीवर   झोपतो. तेव्हा यांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागतो . जेव्हा गुरख्याच्या शिट्यानी  झोपमोड होते म्हणून आपल्याला वैताग येतो तेव्हा आपले हे सैनिक स्वतःच्या छातीवर शत्रूच्या गोळ्या झेलण्याकरिता  तयार असतात .ते तिथे जागे असतात म्हणून आपण घरी निवांत झोपू शकतो .आणि आपल्याला त्यांची आठवण होते जेव्हा त्यांच्या पैकी एखाद्या जवानाला मरणोत्तर वीर चक्र मिळते. पण असे सुद्धा किती असतात ज्यांच्या वाट्याला साधे फुलांचे चक्र सुद्धा येत नाही की त्यांची साधी आठवण सुद्धा येत नाही.अशाच एका जवानाचे स्मारक तिथे बनवले आहे .बाबा मंदिर .हरभजन सिंग नावाचा एक जवान ,जो सीमा रक्षणाच्या ड्युटी  वर होता. अशा जागी ,..जेथे गाडया ,वाहने काही जाऊ शकत नाही . अशा ठिकाणी काही जवान पायी जावूनच राहतात. अतिशय दुर्गम ठिकाणे असतात ही. अशाच एका जागी हा हरभजन सिंग होता .एके दिवशी एका धबधब्यात पाय घसरून पडला आणि मरण पावला .त्याचे हे वीर मरण झाले. त्याच्या मागे नंतर अनेक दंत कथाही जोडल्या गेल्या आहेत . त्याच्या नावे अजूनही भारत सरकार कडून त्याच्या कुटुंबियांना पेन्शन दिले जाते. ही घटना ३० ,४० वर्षापूर्वीची असली तरी. .. अशा घटना ऐकून उर अभिमानाने भरून आला .पण त्यालाही कुठेतरी कारुण्याची झाक होतीच....
अशा या बाबा हरभजन सिंगच्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही छोमगो लेक पाहीले .एवढ्या  उंचीवर एवडे मोठे तळे पाहताना आश्चर्य वाटते. अतिशय स्वच्छ किंचित हिरवट निळसर रंगाची झाक असलेले ते पाणी पाहून एकाच वेळी थोडी भीती पण  वाटली आणि त्या सुंदर वातावरणात   एक प्रकारची मंत्रमुग्धता आली माझ्यात ..... साधू संत अशा वातावरणात का साधना करतात हे पण थोडेसे उमजले . रंगीबेरंगी झुलीनी  सजवलेले  याक सुद्धा इथे दिसले .त्यावर बसवून लहान मुलांना काही जण चक्कर मारत होते .
  आणि  वाटेत काही ठिकाणी बर्फ सुद्धा दिसला.पण तो खूपच थोडा होता . बऱ्याच  वर्षांनी तो पाहिल्यामुळे , पुन्हा लहान मुलासारखे त्यात खेळून घेतले. थंडी वाजू नये म्हणून घातलेली  जीन्स  मी  बर्फावरून पाय घसरून आपटल्याने ओली  झाली आणि फारच गार वाटू लागले. म्हणून माझा ओसंडून जाणाऱ्या उत्साहाला  आवर घालत अहो म्हणले .आता बस ,किती वेळ बर्फात खेळती आहेस ,म्हणून जरा हिरमुसून मी पुन्हा गाडीत चढले.    हे सर्व पाही पर्यंत दुपारचा १ वाजला होता .वातावरण काहीसे ढगाळ वाटू लागले होते .पोटात कावळे कोकलत होते. म्हणून त्याच्या तोंडात  काही कोंबावे म्हणून म्हणून एक दोन उपहार गृहे दिसत होती . तिकडे वळलो. तिथे फक्त दोनच पदार्थ मिळत होते मोमो आणि maagi . मग त्या थंडीमध्ये मस्त पैकी नुडल्स गिळून आम्ही आमची जीप जिथे पार्क केली होती तिकडे जाऊ  लागलो . थोडा पाऊसही पडू लागला. आम्ही गाडीकडे धाव   घेतली .आणि काय आश्चर्य .........चक्क बारीक हिमकणांचा  हिमवर्षाव होऊ लागला . आणि गाडीपर्यंत पोचेपर्यंत त्या बारीक कणांचे   रुपांतर मोठ्या गारांमध्ये   झाले  .गाडीत बसेपर्यंत पती देवांच्या   डोक्यावर एक लिंबाएवढी गार पडली आणि कसेबसे आम्ही गाडी मध्ये घुसलो . एकीकडे जोरात पाऊस , गारपीट  आणि वळणावर काहीही ना दिसत अंदाजे गाडी चालवणारा ड्रायवर. मग मी त्याला म्हणले अहो तुमच्या  गाडीचे वायपर चालू करा की .एक तुच्छ कटाक्ष माझ्याकडे  टाकून तो म्हणला, "बिघडले आहेत.".मला सवय आहे अशीच. माझ्या छातीत धस्स झाले. 
मित्रहो आता पुढचा भाग उद्या सांगणार ,आमचे काय झाले पुढे तो भाग...... 

No comments:

Post a Comment