Thursday, February 10, 2011

सिक्कीमचा 'दावा गेन्झे बुतीया '

सिक्कीमचा 'दावा गेन्झे बुतीया '
दरवर्षी मी कुठे ना कुठे भ्रमंती करत असते .बरेच दिवसात जर कुठे गेले नाही तर मला चैनच पडत नाही .या वेडापायी वेळ ,पैसे काहीही खर्च झाले तरी बेहत्तर .... 
तर या वर्षी मी ईशान्येकडच्या भारताचे दर्शन घ्यायचे ठरवले होते .म्हणून नेटवरून आणि पुस्तके वाचून माहिती गोळा करायला सुरवात केली . ही अशी वेळखाऊ कामे करणे, माझे पती उदार मनाने माझ्याकडे सोपवतात .त्यात मलाही आनंद मिळतो आणि उद्या कुठे बाहेरगावी गेल्यावर काही प्रोब्लेम  आला तर माझे तोंड आपोआपच बंद राहते कारण प्लानिंग  माझे असते ना.........तर मग या वर्षी उन्हाळ्यात थंड होण्यासाठी आम्ही (म्हणजे मीच) सिक्कीम ची निवड केली .यात आम्ही दार्जीलिंग ,गंगटोक,पेलिंग आणि कालीमपोंग अशी चार ठिकाणे पाहणार होतो .या मध्ये सुरवातीस आम्ही दार्जीलिंगचा चहा प्यायचे  ठरवले होते.म्हणजे पहिला मोर्चा दार्जीलिंगला.  दार्जीलिंगला चहा फक्त चहाच्या मळ्यातच पाहणे परवडते .तो घेण्याएवढी आपली ऐपत नसते .कारण तिथे दुकानदार म्हणतात ७००,८०० रुपयाला १ किलो चा चहा काय कुणीही घेईल त्यात मजा नाही. साधारण पणे ३ ते ४००० रुपये किलोचा चहा चांगला असतो .असे म्हणल्याने आम्ही फक्त तो चाय की बागान मधेच पाहून घेतला. पण थंडी मात्र इथल्यासारखी मी भारतात इतरत्र अनुभवली नाही अगदी मे महिन्यात सुद्धा हाडे गोठवणारी थंडी होती तिथे .पण मी तुम्हाला दार्जीलिंगचे प्रवास वर्णन नाही सांगणार आहे ,पण तिथे आलेल्या एकाहून एक जिवंत आणि समृद्ध अनुभवांची शिदोरी उघडणार आहे 
.दार्जीलिंग पाहून झाल्यावर आम्हाला पेलिंग येथे जायचे होते . त्यामुळे सकाळीच  सर्व आटोपून आम्ही  गाडीची वाट पाहू लागलो. या भागात प्रत्येक ठिकाणी वेगळी गाडी ठरवावी लागते म्हणजे दार्जीलिंगची गाडी गंगटोकला चालत नाही. म्हणून रोज वेगळी गाडी नि वेगळा ड्रायवर असे .गाडी तर आजच्या ड्रायवरने फारच छान मेंटेन केली होती .तो साधारण इकडच्या  लोकांच्या प्रमाणे विशिष्ट चेहरेपट्टीचा ,साधारण ४०,४५ वयाचा असावा . ५ मिनिटांनी स्थिरस्थावर  झाल्यावर त्याला तुमचे नाव काय ? कुठले आहात ? अशी विचारणा केली .त्याने सांगितले माझे नाव दावा गेन्झे बुतीया आहे. आता माझा स्वभाव मला स्वस्थ बसू ना देणारा ,म्हणून त्याला विचारले तुम्ही पेलिंग ला जाऊन आज परत येणार का ? त्याने हो म्हणले. आणि गाडीमध्ये अतिशय सुंदर गाणी त्याने लावली ,काही रोमांटिक काही शास्त्रीय  पण सुमधुर ,चहाच्या त्या हिरव्यागार वळणदार बागांमधून आमचा प्रवास अतिशय मस्त सुरु होता .शेजारी माझे  पती आणि मुलगा. आसमंतात पसरलेला काहीसा मंत्र मुग्ध करणारा गारवा, ती गोड गाणी ,आणि मैलोन्मैल पसरलेले चहाचे मळे. याहून स्वर्ग सुख काय वेगळे असते ......मधेच माझ्या मनात विचार आला हे बिचारे पहाडी लोक ,यांना आयुष्यभर याच वळणदार वाटांमधून गाडी फिरवणे या शिवाय बाहेरचे जगच माहित नाही.  पण मला माहित नव्हते . आज मला खूप वेगळा एक अनुभव मिळणार आहे आणि तो पण या साध्या  सुध्या  ड्रायव्हर ... कडून. ज्यांच्याकडे आपले विशेष लक्षही नसते. वाटेत जाता जाता  बरेच गाव वाले त्याला हात करत होते .
 मी त्याला म्हणले "काय हो ,तुमची बरीच मित्र मंडळी आहेत वाटते " .
तो म्हणाला," हा दीदी ,हर किसीसे हसकर  बात करे ,सबकी मदद करे,तो जिंदगी आसानीसे कटती है"|  किती साध्या शब्दात आय्ष्याचे तत्वज्ञान एका पहाडी माणसाकडून मला ऐकायला मिळाले होते .नंतर मग आमच्या गप्पाच सुरु झाल्या . मी त्याला विचारले हे दावा गेन्झे म्हणजे काय? तो म्हणाला मी सोमवारी जन्मलो म्हणून आमच्या कडे दावा असे नाव ठेवतात. आता त्यांची भाषा नक्की धड माहित नसल्याने मी आपले जेवढे मिळाले ते सामान्य ज्ञान झोळीत भरून घेतले .मग माझी गाडी त्याच्या घरच्यांवर घसरली ."तुमच्या घरी कोण कोण असते" ?
तो म्हणाला ,मी आणि माझी आई .
" तुमचे लग्न नाही झाले? "अगदी सहज माझ्या तोंडावर प्रश्न आला
".हो झालेय पण डिवोर्स झाला ."
माझ्या तोंडाचा 'आ' झाला . काय??? तुमच्याकडे पण डिवोर्स होतात?
माझ्या पतीदेवानी माझी पुढे जाणारी गाडी थांबावी म्हणून मला खुणा करायला सुरवात केली .
पण इतकी इन्टरेस्टिंग  गोष्ट ऐकायला मिळणारी संधी कोण सोडेल? 
मग माझी गाडी मी पुन्हा पुढे दामटली .अब वो कहा है?  " तो उत्तरला "जर्मनी मे ".
जर्मनी........ मला तर आश्चर्याचा  झटकाच  बसला. मी विचार केला याच्या बायकोने इथे एखादा जर्मन पटवला  की काय?
तो म्हणाला ,बहनजी वो उधर  नौकरी करती है  .वह तो जर्मन है ना|
 मी आणि आमचे अहो दोघेही सावरून बसलो आणि जीवाचे कान करून त्याची ही जगावेगळी कहाणी ऐकू लागलो . पण ही गोष्ट अशी तशी नव्हे ; स्वत:  जगलेली . आता या दोघांचे लग्न कसे झाले असेल ;ही मोठी उत्सुकता माझ्या मनात होती .
तो म्हणाला, " मै  गया  था उधर घुमने के लिये ९२ ,९३ मे |उधर हम दोनोका प्यार हो गया.| हमने शादी करली| फिर एक लडका हुआ |  मी २,३ साल उधर रहा. लेकीन उन दिनो मे जर्मनीमे प्रोब्लेम्स थे .बाहर वाले लोगोंका रहना  मुष्किल था |मैने उसको बोला ,"भारत चलते है |हमारे देशमे  ऐसा कोई   प्रोब्लेम नही" |लेकीन वो उसका देश नही छोडना चाहती थी| और मुझे लग  रहा था अपने देस जैसी  सुरक्षा  वहा नही है  | और मै यह  आ गया| मेरा बेटा आया था २,३ बार यहा|  उससे कभी कभी बात  होती है फोनपे | लेकीन उसके बाद बिवीसे   कभी नही मिला और वह भी नही आइ" |
मी पुतळा होऊन त्याची जीवनकहाणी ऐकली. खरेच प्रत्यक्षात फिल्मी कहाणी जगलेली व्यक्ती ,जी परदेशात मिळणारी ऐषोआरामी  साफ सुथरी जिंदगी सोडून स्वदेशात निर्धोक पणे हक्काने जगण्यासाठी आपल्या कुटुंबाला सोडून परत आली होती आणि आपल्या म्हाताऱ्या आई बरोबर जीवनाची उर्वरित वाटचाल दुसऱ्या   माणसाना मदत करून निवांतपणे करत होती .
जर्मनीमध्ये आम्ही पण २००० साली  होतो ७,८ महिन्यांकरता .दावा गेन्झे ला जाणवलेली असुरक्षितता आम्हाला कुठेच जाणवली नव्ह्ती ;एवढेच नव्हे तर एक नितांत सुंदर रमणीय आणि पुन्हा पुन्हा साद घालणारा तो देश याची आम्हाला नेहमीच उत्सुकता वाटते म्हणून जास्तच रस घेऊन मी त्याची कहाणी ऐकली होती खरे तर त्या दोघांचे प्रेम कसे जमले हे पण मला विचारायचे होते .पण सध्याची त्याची परिस्थिती पाहता मला त्याच्या दु:खा वरची खपली काढवेना. 
तेवढ्यात एक टायर पंक्चर झालेली गाडी वाटेत दिसली. दावा म्हणाला मी थांबून जरा मदद करू का ? आम्ही त्याला होकार दिला .पंक्चर काढायला वेळ लागत होता म्हणून मी वाटेत दिसत असलेल्या रंगीत नावाच्या नदी चे सौंदर्य ,खोलवर असलेली दरी आणि त्यातून वाहणारी 'रंगीत' नदी पाहू लागले आणि जोरदार वाहणाऱ्या तिचा खळाळता प्रवाह पाहता पाहता माझ्या डोळ्यातील बांध  घातलेल्या भारतीय अश्रुना तिच्या प्रवाहात सामावून टाकले.....................

No comments:

Post a Comment