Wednesday, June 15, 2011

कोणाला कुठे पाहावे ?

कोणाला कुठे पाहावे ?
काय आहे पण एक गम्मत आहे . परवा मी अशीच चालले होते रस्त्याने .मग एका दुकानात गेले .आणि तिथे अचानक मला एक बाई दिसल्या .मला ओळखलेत का ? असे विचारू लागल्या .आता हा असा प्रश्न विचारणाऱ्या लोकांची तर मला बाई धास्तीच असते .कारण एक तर बऱ्याच  वेळा मला ही व्यक्ती कोण हे अजिबात आठवत नाही किंवा नुसता चेहरा आठवतो पण नाव किंवा यांना कुठे पाहीले आहे हे अजिबात आठवत नाही. मग त्या मात्र अशा जोशात बोलू लागल्या की मी त्यांना ओळखले नाही किंवा मला त्यांचे नाव आठवत नाही हा मोठा गुन्हा झालाय ......शेवटी मी त्यांच्यासमोर शरणागती पत्करली आणि म्हणले ,नाही हो काकू मला पहिल्या सारखा वाटतंय पण बाकी आठवत नाही . मग म्हणाल्या ,अहो तुम्ही नाही का मागे लायब्ररी मध्ये यायचात सिंहगड रोडला . तिकडे पाहील होत बऱ्याच  वेळा तुम्हाला .असे त्यांनी सांगितल्यावर  मी सुटकेचा नि:श्वास  टाकला. कदाचित त्यांना लायब्ररीत पाहीले असते तर सहज ओळखले असते .पण देवळात.....आठवले नाही .
     खर म्हणे माणसाला एखाद्या व्यक्तीस एका विशिष्ट ठिकाणी पहायची सवय झाली ना की दुसरीकडे त्या व्यक्तीला पाहूनही लक्षात येत नाही की हा माणूस कोण ? मध्ये एकदा बसने जाताना समोरच्या बाकावरील माणूस मला ओळखीचा वाटू लागला . काही केल्या आठवेना .बर तो माणूस पण काही ओळख  दाखवेना . मग मी कशी विचारणार ? आता एखादी गोष्ट माझ्या डोक्यात घुसली की मी तिचं छडा लागेपर्यंत वेडी पिशी होते . मग दिवसभर मला सारखे तेच आठवत होते .शेवटी एकदम अचानक लक्षात आले की हा माणूस म्हणजे  आमच्या घराजवळच्या किराणा दुकानात असणारा विक्रेता .    
     आता अजून एक प्रश्न म्हणजे माझ्याकडे येणारे जातक .स्वतःच्या समस्या आणि त्यांचे समाधान यावर माझ्याशी तास तास बोलणारे , पण बऱ्याच कुंडल्या  आणि बरेच वर्ष या व्यवसायात असल्याने मी मात्र काही जणांना विसरून जाते .पण त्या लोकांना मात्र त्यांना संकटातून  सुटण्याचा मार्ग दाखवल्याने किंवा त्यांचे दडपण काही प्रमाणात का होईना माझ्याडून कमी झाल्याने त्यांच्या मात्र मी एकदम लक्षात असते .मग कधी अचानक लक्ष्मी रोडवर madam ओळखलत का? मी नाही का आलो होतो बघा ,माझ्या बहिणीच्या लग्न संदर्भात ,किंवा तुम्ही नाही का मला माझ त्या मुलीबरोबर लग्न होईल की नाही हे सांगितलं... किंवा अहो madam  ,अजूनही पाहता का तुम्ही भविष्य ....असे अचानक एक बॉम्ब टाकणारे पण भेटतात ....
      तुम्हाला कुणाला असा अनुभव आलाय का की जी व्यक्ती ज्या ठिकाणी आहे तिथेच ओळखू येते ....मग सांगा की मला  
सोनाली लिखितकर  

Friday, May 20, 2011

तीर्थ क्षेत्र देहू

तीर्थ क्षेत्र देहू
काल बऱ्याच दिवसांनी देहू गावाला गेलो होतो. संध्याकाळ अतिशय शांत ,समोर संथ वाहणारी इंद्रायणी नदी .रात्री घरी परतणाऱ्या पक्षांची लगबग ,तुकारामांनी ३५० वर्षांपूर्वी जागवलेला विठ्ठलाच्या अगाध  भक्तीचा मळा ,आणि त्या खोल डोहामध्ये बुडालेल्या आणि तुकारामंची १३ दिवस कठोर परीक्षा घेऊन पुन्हा जशाच्या तशा मिळालेल्या अमृत मयी अभंग गाथा .सर्वानीच मनावर एक गूढ गंभीर फुंकर घातली होती .संध्याकाळी मंदिरात वाजणारे नगारे , खोल इंद्रायणी नदी  आणि असंख्य विठ्ठलाच्या आणि तुकोबांच्या आठवणी मनात घेऊन ,त्या आठवणींचे  तरंग स्वतःवर उमटत  ;त्या नदी समोर बसलेली मी . असा वाटत होत की पुन्हा त्या संसारात जाऊच नये .इथेच विठ्ठल नामाचा गजर करत त्या परब्रम्हाशी  एकरूप व्हावे .

मानस पूजा

मानस पूजा
आपल्या अध्यात्मिक ग्रंथांमध्ये मानस पुजेस  फार मोठे स्थान दिले आहे .बऱ्याच वेळा काही लोकं पूजा करत असतात पण मन मात्र दुसरीकडे असते .सासूबाई पूजा करता करता आपल्या सुनेस सूचना करत असतात तर सून पूजा करताना मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देत असते .पण केवळ हळदी कुंकू फुले आणि उदबती या पेक्षा काहीही नसताना केलेली मानसपूजा फार महत्वाची ठरते .पण ती कशी करायची याची माहिती व्हावी म्हणुन हा प्रपंच .अर्थात प्रत्येकाची पूजा करण्याची वेगळी पद्धत असू शकते
परवा असंच दुपारी बसले होते .आणि अचानक डोळ्यापुढे मागच्या वर्षी गेलेल्या गंगटोक च्या  जंगलातील आठवणी आल्या .अतिशय सुंदर हिरवेगार पसरलेले जंगल आणि त्यातून झुळ झुळ आवाज करत वाहणारा ओढा, त्या ओढ्याच्या काठा काठाने मी जातीय .शेजारीच मंद सुगंध येणारे एक पांढऱ्या शुभ्र फुलांचे झाड आहे. कसले झाड आहे कुणास ठाऊक ? त्याच्या जवळ गेले आणि ते झाड थोडेसे हलवले तर अगदी माझ्या अंगावर त्याच्या कोमल पाकळ्यांचा  वर्षाव झाला .माझी पावले बुडतील इतक्या पाकळ्यांचा खच पडला .मी अलगद त्यातून एक ओंजळ भरून घेतली आणि त्यांचा सुगंध घ्यावा अशी इच्छा झाली पण त्याच बरोबर माझ्या परम प्रिय प्राण सख्याची मला  आठवण आली. कुठे आहे माझा जिवलग ,? माझा सख्या हरी , माझा कृष्ण ...? बरेच दिवसात दिसला नाही . अगदी त्याच क्षणी एक पांढऱ्या वस्त्रातला एक छोटा मुलगा मला दिसला .अरे बाळा ,माझा कृष्ण कुठे पाहिलास का रे?
अग,  त्या छोट्याशा वाटेने पुढे गेलीस ना की लगेचच त्या झाडांच्या जवळ आहे तो.
बर बाळा, पहाते हा ...असे म्हणुन मी पुढे निघाले .छोट्याशा वाटेने पुढे गेले झाडांच्या मागे पाहीले पण तो दिसला नाही .पुढे पाहीले मागे पाहीले ,गोल फिरून पाहीले . मग अजून जरा पुढे जाऊन पाहीले .कुठेच दिसेना माझा राजा !!मी त्याच्या करता तडफडू लागले .कुठे आहेस रे ?किती वाट पहायची तुझी .?तरीही तो दिसला नाही .मग मात्र डोळ्यात पाणी भरून आले हातातील फुलांच्या ओंजळीवर डोळ्यातील थेंब पडले .त्याच क्षणी त्याच्या बासरीचा; मनाचा ठाव घेणारा आर्त ,पण सुमधुर ध्वनी कानावर पडला .आणि तिथेच एका लाकडाच्या ओंडक्यावर तो दिसला, किती सुंदर !!!!!!!किती प्रेमळ !!!!!!!किती आणि कसा ....शब्दच संपले माझे .त्याच्या कृपाळू नेत्रांकडे पाहीले मी .
"कुठे होतास रे राजा इतके दिवस आणि केव्हाची शोधतीय  मी तुला ?
"अग तुच किती दिवस झाले मला विसरलीस, चक्क २ दिवस झाले गं .....मी तरी केव्हाची वाट पहात बसलोय तुझी इथे . काल तर झोपलो सुद्धा नाही .
पण मगाशी तर इथे दिसला नाहीस ?
अग तुला माहितीय ना तुला, अतिशय आर्त पणे माझी आठवण येईल तेव्हाच मी भेटेन  म्हणुन ....
हो ना कृष्णा, मी उत्तरले .,ही बघ फुले ,किती गोड आहेत ना .
तू माझ्या करता आणलीस ना मग ती खूपच गोड आणि सुंदर असणारच .
कृष्णा ,जरा थांब इथे बस बर ....तुझे पाय पाहू . अरे , ...हे काय रे पितांबराला इतकी धूळ कशी ?
अग काय सांगू ,आज २, ४ भक्त मोठ्या संकटात सापडले होते मग खूप धावाधाव   केली .
अरे राम !मग आता कसे आहेत भक्त गण .?
आता ठीक आहेत गं.
थांब जरा आधी मी जरा तुझ्या चरण कमलांचे दर्शन घेते रे .मग अतिशय हळुवार पणे ,त्याची पावले पाहीली धावून  धावून आणि उन्हातान्हात अगदी लाल झाली होती .मी म्हणाले थांब इथेच .आणि  पटदिशी धावले नदीपाशी . माझ्या ओंजळीत गार पाणी घ्यावे म्हणुन विचार केला तर काय ओंजळीत मगाचीच  फुले राहिली होती .मग ती फुले तिथेच ठेवून दिली आणि हातात थंड पाण्याची ओंजळ घेऊन पळतच त्याच्या कडे गेले .त्या थंड पाण्याने हळुवार चोळून त्याचे सुकोमल चरण धुतले .माझा कमल नयन ,माझ्या कडे आनंदाने पहात होता .अरे थांब ना फुले तिकडेच राहिली .
अग थांब ग ,पहा ....इथे.... त्याने पायाकडे बोट केले . मी नजर टाकली तर काय मी आणलेलीच फुले त्याच्या पायावर .अग तू मनात जेव्हा भावना आणलीस तेव्हाच ती मला पोचली .माझे नेत्र पुन्हा भरून आले .अग राणी किती रडशील सारखी ? तुझे असं  हे अपार प्रेमच मला तुझ्याकडे सारखं खेचून आणत बघ .त्याने माझे हात हातात घेतले आणि मला जवळ बसवले .मी त्याच्या कडे आणि कृष्ण सखा माझ्या कडे ,इतके अपरंपार पाहीले की त्याचे आणि माझे मन अगदी एक होऊन गेले .एक मन , एक विचार, एक शरीर ,....एक आणि एक.... तो आणि मी वेगळे नव्हेच अगदी एक .पुन्हा बासरीचे कर्णमधुर स्वर कानी पडू लागले .त्या स्वरात मी त्याच्याशी पूर्ण एकरूप झाले .जंगल ,पाण्याचा ओढा ,ते शुभ्र फुलांचे झाड ,आणि मी सर्व काही तोच ,माझा श्रीकृष्णमय झाले ......
पूजा म्हणजे अजून वेगळे काय असते ? हीच ती मानस पूजा ...............ज्यांना आवडली त्यांनी जरूर करून पहा आणि मला अनुभव सांगायला विसरू नका.
सोनाली जोशी लिखितकर

चला पार्टीला जाऊ या

चला पार्टीला जाऊ या
अगदी ४,५ दिवसापुर्वीची गोष्ट बघा . ऑफिसमधून घरी आल्या आल्या मिस्टर म्हणाले अग ,ऐकलंस का ? परवा आमच्या ऑफिसमध्ये पार्टी आहे .तुला पण बोलावलंय . संध्याकाळी ७ वाजता जायचय. तर मी ६.३० ला घरी येईन ऑफिस मधून आणि लगेच निघू आपण .तू तयार रहा .असे यांनी म्हणता क्षणीच माझ्या डोक्यात विचार आला ,कपडे काय घालावेत ?
मी --अहो , मी साडी नेसू की ड्रेस घालू ?
अहो -- ड्रेस चालेल की .....
मी -- कोणता घालू?
अहो - अग तुझे , ड्रेस तुलाच माहिती.
मग मी अगदी लहान मुलासारखी ,  मी भाजी फोडणीला टाकली आहे  हे विसरून कपड्यांच्या कपाटाकडे धावले .२, ४ पंजाबी ड्रेस कडे नजर टाकली . हा पांढरा, फारच साधा वाटतोय . हा लाल अगदीच तडक भडक ,नव्या नवरी सारखाच  वाटेल. हा निळा जरा बरा आहे पण तितका खास नाही .हा काळा चांगला आहे पण सध्या एवढ्या लाँग top ची fashion  गेलीय  .त्याला शिवून पण ६,७ वर्षे झालीत .अहो जरा इकडे या ना .सांगा ना मला काय घालू ?
अहो---  अग बघ ना जरा चांगल्या पैकी. असे म्हणत त्यांनी कपाटात डोकावले .बाप रे केवढे ड्रेस झालेत ग . जागा पुरत नाहीय ठेवायला. मला तर वाटतेय तू जन्मभर कपडे नाही विकत घेतलेस तरी पुरतील तुला . त्यांचे हे वाक्य कानावर पडताच मी डोळे वटारले .. काय म्हणालात ? माझ्या मैत्रिणीन कडे तर २, ३ कपाटे भरून ड्रेस आणि साड्या आहेत . तुम्ही लग्न झाल्यापासून एवढ्या वर्षात फक्त पहिल्या लग्नाच्या वाढ दिवसाला साडी घेतली होती .त्यानंतर इतके वर्षात एक तरी साडी घेतलीत का?  
अहो--- अग पण तू मला सांग? तू इतके वर्षात साड्या किती वेळा घातल्यास ? सांग की ?
मी--- माझ्या डोहाळे जेवणात , मग माझ्या भावाच्या लग्नात , तुमच्या बहिणीच्या लग्नात , ;१  २ जणींच्या मंगला गौरीला , आणि दर वर्षी लक्ष्मी  पूजनाला 
अहो --.म्हणजे  तूच हिशोब कर ५अधिक १२ म्हणजे  अंदाजे  १७ वेळा तू या १२ वर्षात साडी घातलीस .आणि तुला किती साड्या आहेत ?
मी --खालच्या मानेने उत्तरले. २२ आहेत .
अहो- मग तुला साडी घेण्यापेक्षा पंजाबी  ड्रेस घेतलेले बरे नाही का?
मी - पण मग आता पार्टीला कोणता घालू ?
अहो - हा चांगला आहे की लेमन कलरचा
मी --- पण याची ओढणी सापडत नाहीय बरेच दिवस
अहो--- मग हा पिंक
मी --याची सलवार फाटलीय
अहो--- मग फेकून दे हा ड्रेस
मी --पण हा ड्रेसचा कलर  खूप गोड आहे .मी दुसरी सलवार . नवीन कापड घेऊन शिवायला टाकणार आहे 
अहो --- अरे रामा, मग हा कसा  आहे बांधणी ?
मी --अहो आता काय बांधणीचा घालू पार्टीला येऊ का ? किती ऑड  वाटेल? लोकं म्हणतील काय घरचाच घालून आली का ही  बाई ? मग हा घालू का ,तपकिरी आणि त्यावर काळी फुलं .
अहो - बर ठीक आहे .पण त्यावर पर्स पण काळीच घे हा.
मी --पण माझ्या कडे तर आता फक्त लाल आणि पांढरीच आहेत .मागच्या वेळेला तुमचीच बहिण म्हणाली , वहिनी ही पर्स किती छान आहे ना काळी ...मी घेऊ का? ,मग मी काय नाही म्हणणार ?  आता माझ्या कडे जरा काही दिसलं चांगल,  की तुमची बहिण विचारणारच लगेच ..वहिनी अग ह्या बांगड्या किती मस्त आहेत ,ड्रेसला पण सुट होत आहेत .नेऊ का?  आणि मागच्या वेळी तर कहरच केला वन्स नी .चक्क माझे सोन्याचे नेकलेस नेले मला ना विचारता , एका लग्न करता आणलेले  .तुम्हाला मी काही बोलले नाही  तेव्हा ,पण माझा जीव नुसता गेला २ दिवस .की कुठे हरवले चांगले ३ तोळ्याचे .मग २ दिवसांनी नणंद बाईंचा फोन आला ,अग वहिनी तुझे नेकलेस मी नेलंय हा घालायला.  खर तिला चांगले झापायचे होते मला पण ,नेकलेस मिळालाय या खुशीत ,वर वर तिला म्हणले .अग त्यात काय ने खुशाल . जळल मेल लक्षण........ .काय बाई एक एक लोकं असतात . आता माझ्या या सगळ्या वक्तव्यावर अहो अगदी मुग गिळून गप्प होते .तसेही त्यांच्या बहिणीला ,आईला काही म्हणले की ते असेच बसतात. हुप्प ....ते गप्प म्हणल्यावर माझे तोंड अजून सुटले .त्या लेमन ड्रेसची ओढणी पण तुमच्या बहिणा बाईनीच   नेली असणार नक्की सांगते. 
 अहो - - पण मग आता परवा ड्रेस कोणता घालतेस ? तुझ्या कडे लाल पर्स चांगली आहे ना तिलाच माच होईल अस ड्रेस घेऊ या मग ...तसेही खूप दिवसात राणी सरकारानाकरिता कुठे काही घेतलंय? तू एक काम कर उद्या माझे ऑफिस सुटण्याच्या वेळेस तिथे ये मग आपण दोघे जाऊ लक्ष्मी रोडला .आणि घेऊ एखादा मस्त ड्रेस पर्स ला सुट होणारा .तीच पर्स घेऊन ये .आणि मग बाहेरच जेऊ .
असे म्हणल्यावर मग माझी कळी  एकदम खुलली .मग हळूच लाडाने त्यांना चापटी मारत मी म्हणले ,पटवता भारी येत तुम्हाला.
पण आजचा स्वयंपाक राहिलाय अजून .आणि डोक्यात ट्यूब  पेटली . अरे  बाप रे मी भाजी खालचा गस चालूच ठेवला होतं .आता करपलीच  असेल  भाजी .तेवढ्यात सासुबाईचा  आवाज आला .अग ,जेवायला बसू या का?  झालय सगळ . मी जाऊन पहाते तर भाजी  कडे नीट पाहून बाकीचाही कुकर वगेरे केले होते.   मग हळूच माझ्या कडे पहात हसत त्या म्हणाल्या झाली का ड्रेसची पसंती , पार्टी करता ? मी नुसतीच हसले .आणि मनात म्हणाले तशा सासुबाई पण चांगल्याच आहेत माझ्या .!!!!!!!!!!!!
 सोनाली जोशी लिखितकर

Monday, March 7, 2011

मला काय करायचे आहे ?

मला काय करायचे आहे ?
रोज सकाळी गजर लावून उठायचे .त्रासिक चेहऱ्याने गजर बंद करायचा. मग पुन्हा ५ मिनिटाने ,आता उठल्याशिवाय भागणार नाही म्हणुन वैतागत उठायचे .प्रातर्विधी आटोपून चहा करायचा .उभ्या उभ्याच प्यायचा .मग मुलांना  उठवायचे .त्यांचे डबे करता करता त्यांचे आवरायचे .डबे भरून मुलीला  शाळेत पाठवायचे .मग पतीराज आळस देत उठणार  .२,४ गोष्टी त्यांना ऐकू जातील अशा बेताने पुट पुटत, "घरात माझ्याशिवाय, कोणीही इकडची काडी  तिकडे करणार नाही", असे म्हणत पसारा आवरायचा. मग पुन्हा एकदा चहा ,नाश्ता सुरु. पति राज आटोपून ऑफिसला गेले की कपडे वॉशिंग मशीनला लावायचे. सासू बाई ,सासर्यांना चहा ,नाश्ता ........मग आपण नाश्ता खायचा .मग दुसऱ्या मुलाचा अभ्यास घ्यायचा .मग अंघोळ .मग २ मिनिटात पूजा .....पूजेतही ,नंतर काय काम करायचं याचा विचार.मग स्वयंपाक.  दुसऱ्या मुलाला  शाळेत पाठवायचे .मग कॉम्पुटर सुरु करून मेसेज पाहणे .मग फोन वरून वेळा  ठरवणे .लोकांच्या समस्या ,अभ्यास करून ठेवणे .त्यावर उपाय लिहून ठेवणे. फोन वर नवीन वेळा घेऊन टायमिंग फिक्स करणे.  मग घाईत जेवण करणे .मग थोडा वेळ फेसबुक. मग मुलगी ; शाळेतून येणार .मग तिचे जेवण . मग थोडा वेळ दोघींचा आराम .मग पुन्हा ४ नंतर आलेल्या लोकांशी बोलून त्यांचे समाधान करणे. एखाद्या व्यक्तीला जेव्हा त्याच्या समस्येचे उपाय सांगेन किंवा त्यांचे दडपण कमी करेन तेव्हा मनात एक आनंदाची लहर उमटते. .............मग पुन्हा संध्याकाळी मुलगा आला की त्याच नाश्ता .मग पुन्हा जेवण बनवणे .मग अहो येणार ...मग सर्वांची जेवणे ...मग मागचे सर्व आवरून एखादी T.V. वरची सीरिअल पाहे पर्यंत डोळे मिटायला लागतात .मग रिमोट नेच T.V. बंद करून आडवे व्हायचे. ...........पुन्हा सकाळी गजर ...........काय आहे हे ...........हे कोणते जगणे आहे... सतत रोज रोज ....तेच..........एक आहे; ......जगातल्या अनेक दुखी कष्टी लोकांपेक्षा आपले जगणे खूप चांगले आहे .पण..........मला अजून काहीच करायचे नाहीय का? असेच माझे आयुष्य जाईल की अजून काही करायचे आहे मला ........काही दिवसांपासून असा विचार सतत मनात येत होता.मग मी ठरवले एक दिवस दुपारी शांतपणे बसून मला माझ्या आयुष्यात काय करायचे आहे हे ठरवले. आता आपले आयुष्य  किती आहे आणि सर्व गोष्टी जमतील की नाही ही गोष्ट निराळी .पण विचार तरी करून पाहायला काय हरकत आहे.
 १) पहिली गोष्ट ; मला माझे शरीर सुदृढ बनवायचे आहे .निरोगी आणि उत्साही .......त्याकरिता मला रोज सकाळी फक्त अर्धा तास लवकर उठावे लागेल आणि थोडा व्यायाम आणि प्राणायाम करावा लागेल .
२) दुसरी गोष्ट मला माझ्या आयुष्यात नव नवीन देश आणि जागा पहायच्या आहेत .आणि त्यावर माझे अनुभव माझ्या वाचकांकरिता लिहायचे आहेत.  ज्यातून त्यांना आनंद मिळेल आणि मार्गदर्शनपण   आता ही माझी अतिशय प्रामाणिक इच्छा आहे या करिता खूप उशीर करून चालणार नाही कारण शरीर थाकायाच्या  अगोदर म्हणजे किमान ५० ते ५५ वयाच्या च्या अगोदर  .......पण याकरिता भरपूर पैसे लागतील जे माझ्याकडे नाहीत. .पण मी काही भाग काटकसर करेल .आणि जे माझे मित्र मैत्रिणी परदेशात राहतात .त्यांच्यापैकी ज्यांच्याकडे मी आणि माझे पति ४, ५दिवस राहू शकू .अशा मित्र मैत्रिणीची मदत घेणे. 
३)तिसरी गोष्ट जेवढे थोडे फार  अध्यात्मिक वाचन झालेले आहे आणि जेवढे माझ्या गुरुनी सांगितले आहे त्याप्रमाणे रोज किमान अर्धा तास ध्यान धारणा किंवा आत्म परीक्षण करून स्वतःची अध्यात्मिक उन्नती करून घेणे. माझी मुले मोठी झाल्यावर या करिता वेळ काढू .असा विचार पहिल्यांदा आला .पण अध्यात्म सांगते की उद्या कधी उगवत नाही .आजच आहे .म्हणुन जेव्हा जमेल तसे पण लगेच सुरु करणार.
४)माझ्या मुलांवर चांगले संस्कार घडवून त्यांना त्याच्या पायावर उभे करणार .या करिता मात्र  प्रत्येक क्षणी दक्षच राहावे लागेल .पण नंतर मात्र त्यांच्या संसारात लुडबुड करण्यापेक्षा अळवावरच्या पाण्याप्रमाणे संसारात असून नसल्यासारखे परमेश्वराच्या आराधनेत जीवन घालवणार . 
असे सध्या तरी डोक्यात आहे .........पाहू पुढे काय काय आहे ..........मला वाटते प्रत्येकाने अशी जर स्वतःच्या जीवनाची उद्दिष्टे लिहून काढली तर जीवन म्हणजे आला दिवस गेला दिवस असे ना राहता, ते  आपल्या उदीष्ट  पर्यंत  पोहोचण्याचा मार्ग बनेल आणि माणूस म्हणून जन्माला आल्याचे सार्थक होईल ."या सर्व गोष्टीत कटाक्षाने सातत्य ठेवणे महत्वाचे आहे ".वरील गोष्टी या माझ्या स्वतःच्या वैयक्तिक उद्दिष्टे आहेत पण याचा अर्थ असा नाही की ती आदर्श आहेत  किंवा तशीच असावीत .पण जी असतील  आणि त्याकरिता  आपल्याला काय काय करावे लागेल याचा जाणीवपूर्वक विचार करा आणि त्याप्रमाणे वागा .आणि ज्यांना माझा हा विचार आवडला हे

Thursday, February 10, 2011

सिक्कीमचा 'दावा गेन्झे बुतीया '

सिक्कीमचा 'दावा गेन्झे बुतीया '
दरवर्षी मी कुठे ना कुठे भ्रमंती करत असते .बरेच दिवसात जर कुठे गेले नाही तर मला चैनच पडत नाही .या वेडापायी वेळ ,पैसे काहीही खर्च झाले तरी बेहत्तर .... 
तर या वर्षी मी ईशान्येकडच्या भारताचे दर्शन घ्यायचे ठरवले होते .म्हणून नेटवरून आणि पुस्तके वाचून माहिती गोळा करायला सुरवात केली . ही अशी वेळखाऊ कामे करणे, माझे पती उदार मनाने माझ्याकडे सोपवतात .त्यात मलाही आनंद मिळतो आणि उद्या कुठे बाहेरगावी गेल्यावर काही प्रोब्लेम  आला तर माझे तोंड आपोआपच बंद राहते कारण प्लानिंग  माझे असते ना.........तर मग या वर्षी उन्हाळ्यात थंड होण्यासाठी आम्ही (म्हणजे मीच) सिक्कीम ची निवड केली .यात आम्ही दार्जीलिंग ,गंगटोक,पेलिंग आणि कालीमपोंग अशी चार ठिकाणे पाहणार होतो .या मध्ये सुरवातीस आम्ही दार्जीलिंगचा चहा प्यायचे  ठरवले होते.म्हणजे पहिला मोर्चा दार्जीलिंगला.  दार्जीलिंगला चहा फक्त चहाच्या मळ्यातच पाहणे परवडते .तो घेण्याएवढी आपली ऐपत नसते .कारण तिथे दुकानदार म्हणतात ७००,८०० रुपयाला १ किलो चा चहा काय कुणीही घेईल त्यात मजा नाही. साधारण पणे ३ ते ४००० रुपये किलोचा चहा चांगला असतो .असे म्हणल्याने आम्ही फक्त तो चाय की बागान मधेच पाहून घेतला. पण थंडी मात्र इथल्यासारखी मी भारतात इतरत्र अनुभवली नाही अगदी मे महिन्यात सुद्धा हाडे गोठवणारी थंडी होती तिथे .पण मी तुम्हाला दार्जीलिंगचे प्रवास वर्णन नाही सांगणार आहे ,पण तिथे आलेल्या एकाहून एक जिवंत आणि समृद्ध अनुभवांची शिदोरी उघडणार आहे 
.दार्जीलिंग पाहून झाल्यावर आम्हाला पेलिंग येथे जायचे होते . त्यामुळे सकाळीच  सर्व आटोपून आम्ही  गाडीची वाट पाहू लागलो. या भागात प्रत्येक ठिकाणी वेगळी गाडी ठरवावी लागते म्हणजे दार्जीलिंगची गाडी गंगटोकला चालत नाही. म्हणून रोज वेगळी गाडी नि वेगळा ड्रायवर असे .गाडी तर आजच्या ड्रायवरने फारच छान मेंटेन केली होती .तो साधारण इकडच्या  लोकांच्या प्रमाणे विशिष्ट चेहरेपट्टीचा ,साधारण ४०,४५ वयाचा असावा . ५ मिनिटांनी स्थिरस्थावर  झाल्यावर त्याला तुमचे नाव काय ? कुठले आहात ? अशी विचारणा केली .त्याने सांगितले माझे नाव दावा गेन्झे बुतीया आहे. आता माझा स्वभाव मला स्वस्थ बसू ना देणारा ,म्हणून त्याला विचारले तुम्ही पेलिंग ला जाऊन आज परत येणार का ? त्याने हो म्हणले. आणि गाडीमध्ये अतिशय सुंदर गाणी त्याने लावली ,काही रोमांटिक काही शास्त्रीय  पण सुमधुर ,चहाच्या त्या हिरव्यागार वळणदार बागांमधून आमचा प्रवास अतिशय मस्त सुरु होता .शेजारी माझे  पती आणि मुलगा. आसमंतात पसरलेला काहीसा मंत्र मुग्ध करणारा गारवा, ती गोड गाणी ,आणि मैलोन्मैल पसरलेले चहाचे मळे. याहून स्वर्ग सुख काय वेगळे असते ......मधेच माझ्या मनात विचार आला हे बिचारे पहाडी लोक ,यांना आयुष्यभर याच वळणदार वाटांमधून गाडी फिरवणे या शिवाय बाहेरचे जगच माहित नाही.  पण मला माहित नव्हते . आज मला खूप वेगळा एक अनुभव मिळणार आहे आणि तो पण या साध्या  सुध्या  ड्रायव्हर ... कडून. ज्यांच्याकडे आपले विशेष लक्षही नसते. वाटेत जाता जाता  बरेच गाव वाले त्याला हात करत होते .
 मी त्याला म्हणले "काय हो ,तुमची बरीच मित्र मंडळी आहेत वाटते " .
तो म्हणाला," हा दीदी ,हर किसीसे हसकर  बात करे ,सबकी मदद करे,तो जिंदगी आसानीसे कटती है"|  किती साध्या शब्दात आय्ष्याचे तत्वज्ञान एका पहाडी माणसाकडून मला ऐकायला मिळाले होते .नंतर मग आमच्या गप्पाच सुरु झाल्या . मी त्याला विचारले हे दावा गेन्झे म्हणजे काय? तो म्हणाला मी सोमवारी जन्मलो म्हणून आमच्या कडे दावा असे नाव ठेवतात. आता त्यांची भाषा नक्की धड माहित नसल्याने मी आपले जेवढे मिळाले ते सामान्य ज्ञान झोळीत भरून घेतले .मग माझी गाडी त्याच्या घरच्यांवर घसरली ."तुमच्या घरी कोण कोण असते" ?
तो म्हणाला ,मी आणि माझी आई .
" तुमचे लग्न नाही झाले? "अगदी सहज माझ्या तोंडावर प्रश्न आला
".हो झालेय पण डिवोर्स झाला ."
माझ्या तोंडाचा 'आ' झाला . काय??? तुमच्याकडे पण डिवोर्स होतात?
माझ्या पतीदेवानी माझी पुढे जाणारी गाडी थांबावी म्हणून मला खुणा करायला सुरवात केली .
पण इतकी इन्टरेस्टिंग  गोष्ट ऐकायला मिळणारी संधी कोण सोडेल? 
मग माझी गाडी मी पुन्हा पुढे दामटली .अब वो कहा है?  " तो उत्तरला "जर्मनी मे ".
जर्मनी........ मला तर आश्चर्याचा  झटकाच  बसला. मी विचार केला याच्या बायकोने इथे एखादा जर्मन पटवला  की काय?
तो म्हणाला ,बहनजी वो उधर  नौकरी करती है  .वह तो जर्मन है ना|
 मी आणि आमचे अहो दोघेही सावरून बसलो आणि जीवाचे कान करून त्याची ही जगावेगळी कहाणी ऐकू लागलो . पण ही गोष्ट अशी तशी नव्हे ; स्वत:  जगलेली . आता या दोघांचे लग्न कसे झाले असेल ;ही मोठी उत्सुकता माझ्या मनात होती .
तो म्हणाला, " मै  गया  था उधर घुमने के लिये ९२ ,९३ मे |उधर हम दोनोका प्यार हो गया.| हमने शादी करली| फिर एक लडका हुआ |  मी २,३ साल उधर रहा. लेकीन उन दिनो मे जर्मनीमे प्रोब्लेम्स थे .बाहर वाले लोगोंका रहना  मुष्किल था |मैने उसको बोला ,"भारत चलते है |हमारे देशमे  ऐसा कोई   प्रोब्लेम नही" |लेकीन वो उसका देश नही छोडना चाहती थी| और मुझे लग  रहा था अपने देस जैसी  सुरक्षा  वहा नही है  | और मै यह  आ गया| मेरा बेटा आया था २,३ बार यहा|  उससे कभी कभी बात  होती है फोनपे | लेकीन उसके बाद बिवीसे   कभी नही मिला और वह भी नही आइ" |
मी पुतळा होऊन त्याची जीवनकहाणी ऐकली. खरेच प्रत्यक्षात फिल्मी कहाणी जगलेली व्यक्ती ,जी परदेशात मिळणारी ऐषोआरामी  साफ सुथरी जिंदगी सोडून स्वदेशात निर्धोक पणे हक्काने जगण्यासाठी आपल्या कुटुंबाला सोडून परत आली होती आणि आपल्या म्हाताऱ्या आई बरोबर जीवनाची उर्वरित वाटचाल दुसऱ्या   माणसाना मदत करून निवांतपणे करत होती .
जर्मनीमध्ये आम्ही पण २००० साली  होतो ७,८ महिन्यांकरता .दावा गेन्झे ला जाणवलेली असुरक्षितता आम्हाला कुठेच जाणवली नव्ह्ती ;एवढेच नव्हे तर एक नितांत सुंदर रमणीय आणि पुन्हा पुन्हा साद घालणारा तो देश याची आम्हाला नेहमीच उत्सुकता वाटते म्हणून जास्तच रस घेऊन मी त्याची कहाणी ऐकली होती खरे तर त्या दोघांचे प्रेम कसे जमले हे पण मला विचारायचे होते .पण सध्याची त्याची परिस्थिती पाहता मला त्याच्या दु:खा वरची खपली काढवेना. 
तेवढ्यात एक टायर पंक्चर झालेली गाडी वाटेत दिसली. दावा म्हणाला मी थांबून जरा मदद करू का ? आम्ही त्याला होकार दिला .पंक्चर काढायला वेळ लागत होता म्हणून मी वाटेत दिसत असलेल्या रंगीत नावाच्या नदी चे सौंदर्य ,खोलवर असलेली दरी आणि त्यातून वाहणारी 'रंगीत' नदी पाहू लागले आणि जोरदार वाहणाऱ्या तिचा खळाळता प्रवाह पाहता पाहता माझ्या डोळ्यातील बांध  घातलेल्या भारतीय अश्रुना तिच्या प्रवाहात सामावून टाकले.....................

दगडफूल

दगडफूल
सहजच जुन्या आठवणी आल्या . पण फार जुन्याही वाटेनात.  मी असेन तेव्हा साधारण  सातवीत किंवा आठवीत. तेव्हा पावसाळा होता. मी शाळेत नवीनच प्रवेश घेतला होता . पण तशा ४, ५ मैत्रिणी होत्या . शाळेत जायचे म्हणजे शाळेचे मैदान ओलांडून जावे लागायचे.  आणि ते मैदान म्हणजे शेतजमीनच होती . पावसाळ्यात असा चिखल व्हायचा म्हणता कि बोलायची सोय नाही. एक पाऊल टाकले कि ते अर्धा फुट आत जायचे आणि वर काढले कि चपलेला मोठा चिखलाचा गोळा चिकटून मगच चप्पल बाहेर यायची. शेवटी वर्गात पोचेपर्यंत चप्पल फुट फुट उंच झाल्या असायच्या. बरे तेव्हा बूट वगेरे भानगड नव्हती. मग दिवसभर पाऊस असाच वेड्यासारखा कोसळायचा. मग पाणी वर्गाच्या छतातून टपकायला लागायचे . कधी या बाकावर तर कधी त्या बाकावर .... मग प्रत्येकजण बाके सरकवून बसायचे .आणि गम्मत म्हणजे मग कधी कधी आमच्या बाई बाके जोडून बसायला सांगायच्या . आमची शाळा मुलामुलींची होती. आणि तेव्हा हल्लीसारखे मुले मुली बोलत नसत  . वरून पावसाचे पाणी टप टप गळत असे. दरवाज्यातून ,फुटलेल्या काचातून पावसाचे  पाणी आत येत असे.
असे कधी कधी खूप छान  वाटायचे . कोणाचेच लक्ष नसायचे कि बाई काय शिकवत आहेत. गारठ्याने कधी कधी दात वाजायला लागायचे . त्यातच काही मुलांचे नि मुलांचे एकमेकांकडे चोरून पाहणे सुरु असायचे .ते क्वचित माझ्याही लक्षात यायचे . मग आमच्या  मैत्रीणीना  गुप्त बातमी कि कोणाचे कोणाशी काय चालू आहे . पण हे सगळे अगदी निष्पाप पणे हं.  हल्लीच्या मुलांएवढे  जनरल नॉलेज आमचे नव्हते. असेच कसेतरी पहिले ५ तास संपायचे . मग २०, २५ मिनिटाची सुट्टी असे . सुट्टी झाली रे झाली कि आम्ही ४,  ५ मैत्रिणी मागच्या गेट मधून जाऊन एक  रस्ता  ओलांडून बाहेर पळायचो . त्या रस्त्या पलीकडे एक मोठे खडकाळ मैदान होते . पुढे एक जरा खोल असा भाग होता . त्यातून पावसाळ्यात ओढ्यासारखे पाणी वाहायचे .ते पाणी पहात राहणे हं आमचा आवडता छंद  होता . मध्ये बरेच उंच गवत उगवले होते. त्या खडकाळ आणि पावसाने  शेवाळे उगवून बुळबुळीत झालेल्या खडकांवर आम्ही बसायचो.  पाण्याकडे पाहायचो. त्या खोल पाण्यत आणि शेजारच्या उंच खडकांमध्ये जेमतेम एक फुटाची अशी चिंचोळी पट्टी होती. त्या चिंचोळ्या पट्टी वरून  कसाबसा पाय सावरत एका हाताने खडकाचा आधार घेत आम्ही दोघी तिघी पलीकडेपर्यंत जाऊन यायचो. तिथे काही खडकांवर दगड्फुले उगवली होती . खरे म्हणजे आमच्या दोघी तिघींचा; ती मसाल्यात वापरतो ती  दगड्फुले आहेत कि नाही यावर मतभेद होत असे. आता कॉलेजमध्ये मी जेव्हा वनस्पती शास्त्राची   पदवीधर झाले. तेव्हा कळले कि ती खरोखरच दगड्फुले होती. बऱ्याच वेळा आजही मसाला बनवण्याकरता दगड्फुले विकत  घेते तेव्हाही  मला ती शाळेमागच्या  धबधब्या जवळची आठवतात . आणि वाटते या क्षणी परत तिथे जावे   मैत्रिणीबरोबर  .पण आता इथे कोणीच नाही साऱ्या लग्न होऊन सासरी वेगवेगळ्या  गावांना गेल्या . मी पण संसारात अडकले . पण त्या आठवणी अजूनही मला हळुवार करतात.  संसाराच्या व्यापामुळे मला तिथे जाता येत नाही . आणि कदाचित या वयात त्या वाटेवर चालता येईल कि नाही हे पण सांगता येत नाही  . तेव्हा वाटत  माझ  मन पण झालय एक दगडफूल ;...............  खडकावरच आपलं  जीवन जगणारं ...........
सोनाली जोशी लिखितकर