Friday, May 20, 2011

तीर्थ क्षेत्र देहू

तीर्थ क्षेत्र देहू
काल बऱ्याच दिवसांनी देहू गावाला गेलो होतो. संध्याकाळ अतिशय शांत ,समोर संथ वाहणारी इंद्रायणी नदी .रात्री घरी परतणाऱ्या पक्षांची लगबग ,तुकारामांनी ३५० वर्षांपूर्वी जागवलेला विठ्ठलाच्या अगाध  भक्तीचा मळा ,आणि त्या खोल डोहामध्ये बुडालेल्या आणि तुकारामंची १३ दिवस कठोर परीक्षा घेऊन पुन्हा जशाच्या तशा मिळालेल्या अमृत मयी अभंग गाथा .सर्वानीच मनावर एक गूढ गंभीर फुंकर घातली होती .संध्याकाळी मंदिरात वाजणारे नगारे , खोल इंद्रायणी नदी  आणि असंख्य विठ्ठलाच्या आणि तुकोबांच्या आठवणी मनात घेऊन ,त्या आठवणींचे  तरंग स्वतःवर उमटत  ;त्या नदी समोर बसलेली मी . असा वाटत होत की पुन्हा त्या संसारात जाऊच नये .इथेच विठ्ठल नामाचा गजर करत त्या परब्रम्हाशी  एकरूप व्हावे .

मानस पूजा

मानस पूजा
आपल्या अध्यात्मिक ग्रंथांमध्ये मानस पुजेस  फार मोठे स्थान दिले आहे .बऱ्याच वेळा काही लोकं पूजा करत असतात पण मन मात्र दुसरीकडे असते .सासूबाई पूजा करता करता आपल्या सुनेस सूचना करत असतात तर सून पूजा करताना मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देत असते .पण केवळ हळदी कुंकू फुले आणि उदबती या पेक्षा काहीही नसताना केलेली मानसपूजा फार महत्वाची ठरते .पण ती कशी करायची याची माहिती व्हावी म्हणुन हा प्रपंच .अर्थात प्रत्येकाची पूजा करण्याची वेगळी पद्धत असू शकते
परवा असंच दुपारी बसले होते .आणि अचानक डोळ्यापुढे मागच्या वर्षी गेलेल्या गंगटोक च्या  जंगलातील आठवणी आल्या .अतिशय सुंदर हिरवेगार पसरलेले जंगल आणि त्यातून झुळ झुळ आवाज करत वाहणारा ओढा, त्या ओढ्याच्या काठा काठाने मी जातीय .शेजारीच मंद सुगंध येणारे एक पांढऱ्या शुभ्र फुलांचे झाड आहे. कसले झाड आहे कुणास ठाऊक ? त्याच्या जवळ गेले आणि ते झाड थोडेसे हलवले तर अगदी माझ्या अंगावर त्याच्या कोमल पाकळ्यांचा  वर्षाव झाला .माझी पावले बुडतील इतक्या पाकळ्यांचा खच पडला .मी अलगद त्यातून एक ओंजळ भरून घेतली आणि त्यांचा सुगंध घ्यावा अशी इच्छा झाली पण त्याच बरोबर माझ्या परम प्रिय प्राण सख्याची मला  आठवण आली. कुठे आहे माझा जिवलग ,? माझा सख्या हरी , माझा कृष्ण ...? बरेच दिवसात दिसला नाही . अगदी त्याच क्षणी एक पांढऱ्या वस्त्रातला एक छोटा मुलगा मला दिसला .अरे बाळा ,माझा कृष्ण कुठे पाहिलास का रे?
अग,  त्या छोट्याशा वाटेने पुढे गेलीस ना की लगेचच त्या झाडांच्या जवळ आहे तो.
बर बाळा, पहाते हा ...असे म्हणुन मी पुढे निघाले .छोट्याशा वाटेने पुढे गेले झाडांच्या मागे पाहीले पण तो दिसला नाही .पुढे पाहीले मागे पाहीले ,गोल फिरून पाहीले . मग अजून जरा पुढे जाऊन पाहीले .कुठेच दिसेना माझा राजा !!मी त्याच्या करता तडफडू लागले .कुठे आहेस रे ?किती वाट पहायची तुझी .?तरीही तो दिसला नाही .मग मात्र डोळ्यात पाणी भरून आले हातातील फुलांच्या ओंजळीवर डोळ्यातील थेंब पडले .त्याच क्षणी त्याच्या बासरीचा; मनाचा ठाव घेणारा आर्त ,पण सुमधुर ध्वनी कानावर पडला .आणि तिथेच एका लाकडाच्या ओंडक्यावर तो दिसला, किती सुंदर !!!!!!!किती प्रेमळ !!!!!!!किती आणि कसा ....शब्दच संपले माझे .त्याच्या कृपाळू नेत्रांकडे पाहीले मी .
"कुठे होतास रे राजा इतके दिवस आणि केव्हाची शोधतीय  मी तुला ?
"अग तुच किती दिवस झाले मला विसरलीस, चक्क २ दिवस झाले गं .....मी तरी केव्हाची वाट पहात बसलोय तुझी इथे . काल तर झोपलो सुद्धा नाही .
पण मगाशी तर इथे दिसला नाहीस ?
अग तुला माहितीय ना तुला, अतिशय आर्त पणे माझी आठवण येईल तेव्हाच मी भेटेन  म्हणुन ....
हो ना कृष्णा, मी उत्तरले .,ही बघ फुले ,किती गोड आहेत ना .
तू माझ्या करता आणलीस ना मग ती खूपच गोड आणि सुंदर असणारच .
कृष्णा ,जरा थांब इथे बस बर ....तुझे पाय पाहू . अरे , ...हे काय रे पितांबराला इतकी धूळ कशी ?
अग काय सांगू ,आज २, ४ भक्त मोठ्या संकटात सापडले होते मग खूप धावाधाव   केली .
अरे राम !मग आता कसे आहेत भक्त गण .?
आता ठीक आहेत गं.
थांब जरा आधी मी जरा तुझ्या चरण कमलांचे दर्शन घेते रे .मग अतिशय हळुवार पणे ,त्याची पावले पाहीली धावून  धावून आणि उन्हातान्हात अगदी लाल झाली होती .मी म्हणाले थांब इथेच .आणि  पटदिशी धावले नदीपाशी . माझ्या ओंजळीत गार पाणी घ्यावे म्हणुन विचार केला तर काय ओंजळीत मगाचीच  फुले राहिली होती .मग ती फुले तिथेच ठेवून दिली आणि हातात थंड पाण्याची ओंजळ घेऊन पळतच त्याच्या कडे गेले .त्या थंड पाण्याने हळुवार चोळून त्याचे सुकोमल चरण धुतले .माझा कमल नयन ,माझ्या कडे आनंदाने पहात होता .अरे थांब ना फुले तिकडेच राहिली .
अग थांब ग ,पहा ....इथे.... त्याने पायाकडे बोट केले . मी नजर टाकली तर काय मी आणलेलीच फुले त्याच्या पायावर .अग तू मनात जेव्हा भावना आणलीस तेव्हाच ती मला पोचली .माझे नेत्र पुन्हा भरून आले .अग राणी किती रडशील सारखी ? तुझे असं  हे अपार प्रेमच मला तुझ्याकडे सारखं खेचून आणत बघ .त्याने माझे हात हातात घेतले आणि मला जवळ बसवले .मी त्याच्या कडे आणि कृष्ण सखा माझ्या कडे ,इतके अपरंपार पाहीले की त्याचे आणि माझे मन अगदी एक होऊन गेले .एक मन , एक विचार, एक शरीर ,....एक आणि एक.... तो आणि मी वेगळे नव्हेच अगदी एक .पुन्हा बासरीचे कर्णमधुर स्वर कानी पडू लागले .त्या स्वरात मी त्याच्याशी पूर्ण एकरूप झाले .जंगल ,पाण्याचा ओढा ,ते शुभ्र फुलांचे झाड ,आणि मी सर्व काही तोच ,माझा श्रीकृष्णमय झाले ......
पूजा म्हणजे अजून वेगळे काय असते ? हीच ती मानस पूजा ...............ज्यांना आवडली त्यांनी जरूर करून पहा आणि मला अनुभव सांगायला विसरू नका.
सोनाली जोशी लिखितकर

चला पार्टीला जाऊ या

चला पार्टीला जाऊ या
अगदी ४,५ दिवसापुर्वीची गोष्ट बघा . ऑफिसमधून घरी आल्या आल्या मिस्टर म्हणाले अग ,ऐकलंस का ? परवा आमच्या ऑफिसमध्ये पार्टी आहे .तुला पण बोलावलंय . संध्याकाळी ७ वाजता जायचय. तर मी ६.३० ला घरी येईन ऑफिस मधून आणि लगेच निघू आपण .तू तयार रहा .असे यांनी म्हणता क्षणीच माझ्या डोक्यात विचार आला ,कपडे काय घालावेत ?
मी --अहो , मी साडी नेसू की ड्रेस घालू ?
अहो -- ड्रेस चालेल की .....
मी -- कोणता घालू?
अहो - अग तुझे , ड्रेस तुलाच माहिती.
मग मी अगदी लहान मुलासारखी ,  मी भाजी फोडणीला टाकली आहे  हे विसरून कपड्यांच्या कपाटाकडे धावले .२, ४ पंजाबी ड्रेस कडे नजर टाकली . हा पांढरा, फारच साधा वाटतोय . हा लाल अगदीच तडक भडक ,नव्या नवरी सारखाच  वाटेल. हा निळा जरा बरा आहे पण तितका खास नाही .हा काळा चांगला आहे पण सध्या एवढ्या लाँग top ची fashion  गेलीय  .त्याला शिवून पण ६,७ वर्षे झालीत .अहो जरा इकडे या ना .सांगा ना मला काय घालू ?
अहो---  अग बघ ना जरा चांगल्या पैकी. असे म्हणत त्यांनी कपाटात डोकावले .बाप रे केवढे ड्रेस झालेत ग . जागा पुरत नाहीय ठेवायला. मला तर वाटतेय तू जन्मभर कपडे नाही विकत घेतलेस तरी पुरतील तुला . त्यांचे हे वाक्य कानावर पडताच मी डोळे वटारले .. काय म्हणालात ? माझ्या मैत्रिणीन कडे तर २, ३ कपाटे भरून ड्रेस आणि साड्या आहेत . तुम्ही लग्न झाल्यापासून एवढ्या वर्षात फक्त पहिल्या लग्नाच्या वाढ दिवसाला साडी घेतली होती .त्यानंतर इतके वर्षात एक तरी साडी घेतलीत का?  
अहो--- अग पण तू मला सांग? तू इतके वर्षात साड्या किती वेळा घातल्यास ? सांग की ?
मी--- माझ्या डोहाळे जेवणात , मग माझ्या भावाच्या लग्नात , तुमच्या बहिणीच्या लग्नात , ;१  २ जणींच्या मंगला गौरीला , आणि दर वर्षी लक्ष्मी  पूजनाला 
अहो --.म्हणजे  तूच हिशोब कर ५अधिक १२ म्हणजे  अंदाजे  १७ वेळा तू या १२ वर्षात साडी घातलीस .आणि तुला किती साड्या आहेत ?
मी --खालच्या मानेने उत्तरले. २२ आहेत .
अहो- मग तुला साडी घेण्यापेक्षा पंजाबी  ड्रेस घेतलेले बरे नाही का?
मी - पण मग आता पार्टीला कोणता घालू ?
अहो - हा चांगला आहे की लेमन कलरचा
मी --- पण याची ओढणी सापडत नाहीय बरेच दिवस
अहो--- मग हा पिंक
मी --याची सलवार फाटलीय
अहो--- मग फेकून दे हा ड्रेस
मी --पण हा ड्रेसचा कलर  खूप गोड आहे .मी दुसरी सलवार . नवीन कापड घेऊन शिवायला टाकणार आहे 
अहो --- अरे रामा, मग हा कसा  आहे बांधणी ?
मी --अहो आता काय बांधणीचा घालू पार्टीला येऊ का ? किती ऑड  वाटेल? लोकं म्हणतील काय घरचाच घालून आली का ही  बाई ? मग हा घालू का ,तपकिरी आणि त्यावर काळी फुलं .
अहो - बर ठीक आहे .पण त्यावर पर्स पण काळीच घे हा.
मी --पण माझ्या कडे तर आता फक्त लाल आणि पांढरीच आहेत .मागच्या वेळेला तुमचीच बहिण म्हणाली , वहिनी ही पर्स किती छान आहे ना काळी ...मी घेऊ का? ,मग मी काय नाही म्हणणार ?  आता माझ्या कडे जरा काही दिसलं चांगल,  की तुमची बहिण विचारणारच लगेच ..वहिनी अग ह्या बांगड्या किती मस्त आहेत ,ड्रेसला पण सुट होत आहेत .नेऊ का?  आणि मागच्या वेळी तर कहरच केला वन्स नी .चक्क माझे सोन्याचे नेकलेस नेले मला ना विचारता , एका लग्न करता आणलेले  .तुम्हाला मी काही बोलले नाही  तेव्हा ,पण माझा जीव नुसता गेला २ दिवस .की कुठे हरवले चांगले ३ तोळ्याचे .मग २ दिवसांनी नणंद बाईंचा फोन आला ,अग वहिनी तुझे नेकलेस मी नेलंय हा घालायला.  खर तिला चांगले झापायचे होते मला पण ,नेकलेस मिळालाय या खुशीत ,वर वर तिला म्हणले .अग त्यात काय ने खुशाल . जळल मेल लक्षण........ .काय बाई एक एक लोकं असतात . आता माझ्या या सगळ्या वक्तव्यावर अहो अगदी मुग गिळून गप्प होते .तसेही त्यांच्या बहिणीला ,आईला काही म्हणले की ते असेच बसतात. हुप्प ....ते गप्प म्हणल्यावर माझे तोंड अजून सुटले .त्या लेमन ड्रेसची ओढणी पण तुमच्या बहिणा बाईनीच   नेली असणार नक्की सांगते. 
 अहो - - पण मग आता परवा ड्रेस कोणता घालतेस ? तुझ्या कडे लाल पर्स चांगली आहे ना तिलाच माच होईल अस ड्रेस घेऊ या मग ...तसेही खूप दिवसात राणी सरकारानाकरिता कुठे काही घेतलंय? तू एक काम कर उद्या माझे ऑफिस सुटण्याच्या वेळेस तिथे ये मग आपण दोघे जाऊ लक्ष्मी रोडला .आणि घेऊ एखादा मस्त ड्रेस पर्स ला सुट होणारा .तीच पर्स घेऊन ये .आणि मग बाहेरच जेऊ .
असे म्हणल्यावर मग माझी कळी  एकदम खुलली .मग हळूच लाडाने त्यांना चापटी मारत मी म्हणले ,पटवता भारी येत तुम्हाला.
पण आजचा स्वयंपाक राहिलाय अजून .आणि डोक्यात ट्यूब  पेटली . अरे  बाप रे मी भाजी खालचा गस चालूच ठेवला होतं .आता करपलीच  असेल  भाजी .तेवढ्यात सासुबाईचा  आवाज आला .अग ,जेवायला बसू या का?  झालय सगळ . मी जाऊन पहाते तर भाजी  कडे नीट पाहून बाकीचाही कुकर वगेरे केले होते.   मग हळूच माझ्या कडे पहात हसत त्या म्हणाल्या झाली का ड्रेसची पसंती , पार्टी करता ? मी नुसतीच हसले .आणि मनात म्हणाले तशा सासुबाई पण चांगल्याच आहेत माझ्या .!!!!!!!!!!!!
 सोनाली जोशी लिखितकर